पत्रकार आणि सरपंचावर हल्ला, 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन – एका हॉटेलात मित्रासमवेत जेवणासाठी गेलेल्या पत्रकारावर व कोठाळवाडीचे सरपंच तथा युवक कॉंग्रेसचे नेते अनंत लंगडे यांच्यावर अकारण हल्ला केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

कळंब येथील पत्रकार दिपक नामदेव माळी हे आपले मित्र सप्निल आधंळकर, बाळू हारकर यांच्यासमवेत कळंब बार्शी रस्त्यावरील एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते.रविवारी सायंकाळच्या सुमारास जेवण करत असतांना यापैकी स्वप्निल आधंळकर, बाळू हारकर व दिपक माळी यास शफीक मोमीन व मेहबूब शेख व अन्य दोघांनी अकारण मारहाण केली.

याप्रकरणी दिपक माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शफीक मोमीन, मेहबूब शेख व अन्य दोन व्यक्तिविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात भादवी ३२३,३२४,३४,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्या प्रकरणात कोठाळवाडी येथील सरपंच तथा युवक कॉग्रंसचे माजी प्रदेश सरचिटणीस अनंत नानासाहेब लंगडे गावातील टोकणी येथील सप्ताहासाठी येत असलेल्या गुलबर्गा येथील महाराजांना आणण्यासाठी कळंबला गेले होते. यावेळी आपल्या एमएच २५ एल ४०४१ या डस्टर गाडीतून गावाकडे परतत असतांना रविवारी सायंकाळच्या सुमारास कळंब येरमाळा रस्त्यावरील त्याच हॉटेलच्या परिसरात शफीक मोमीन व अन्य पाच साथीदारांनी अकारण गाडीवर दगडफेक केली.

यावेळी लंगडे यांना धक्काबुक्की ही करण्यात आली. याप्रकरणी आनंत नानासाहेब लंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत देवस्थानवरील दानपेटीतून काढलेले व आपल्या गाडीत ठेवलेले ७० हजार रूपये ही यावेळी लंपास करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सहा व्यक्तिविरूद्ध भादवी १४७, १४९, ३२३, ३२७, ३४१,४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दिपक माळी यांच्यावर हल्ला करणार्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदार व पोलीसांना निवेदन देण्यात आले. यात आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर,विश्वस्त सतीश टोणगे, ज्ञानेश्वर पतंगे,माधवसिंग राजपुत, शितलकुमार घोंगडे,रमेश अंबीरकर,बालाजी सुरवसे,अमर चोंदे,ओंकार कुलकर्णी,राजे सावंत,शिवप्रसाद बियाणी,नरसिंग खिचडे यांच्यासह शिवसंग्रामचे अविनाश खापे, संभाजी ब्रिगेडचे राहुल चोंदे आदी उपस्थित होते.