UP : कानपुरमध्ये सराईताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर फायरिंग, DSP सह 8 जण शहीद

लखनऊ : कानपुरच्या ग्रामीण भागात एका हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये एका डेप्युटी एसपीसह आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले. हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कानपुर ग्रामीणमधील शिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरू गावात हिस्ट्रीशीटर विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिस आले होते.

दबा धरून बसलेल्या गुंडांनी पोलीसांना घेराव घालून फायरिंग केली. यामध्ये आठ पोलीस शहीद झाले. विकास दुबे तोच गुन्हेगार आहे, ज्याने 2001 मध्ये राजनाथ सिंह सरकारमध्ये मंत्री दर्जा असलेल्या संतोष शुक्लाची पोलीस ठाण्यात घुसून हत्या केली होती. घटनेनंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी आणि अपर मुख्य सचिव गृह यांच्याशी चर्चा केली.

आठ पोलीस शहीद
बिल्हौरचे सीओ देवेंद्र मिश्र, शिवराजपुरचे एसओ महेश यादव, दोन सब इन्स्पेक्टर आणि 4 हवालदार शहीद झाले. याशिवाय सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, ज्यापैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे. पोलीस एका हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात विकास दुबेला अटक करण्यासाठी गेले होते. विकासविरूद्ध 60 केसस दाखल आहेत.

गोळीबारात झालेल्या शहीद पोलिसांची नावे

1 -देवेंद्र कुमार मिश्र, सीओ बिल्हौर

2 – महेश यादव, एसओ शिवराजपुर

3 – अनूप कुमार, पोलीस ठाणे इन्चार्ज मंधना

4 – नेबूलाल, सब इन्स्पेक्टर, शिवराजपुर

5 – सुल्तान सिंह कॉन्स्टेबल, चौबेपुर

6 – राहुल, कॉन्स्टेबल, बिठूर

7 – जितेंद्र, कॉन्स्टेबल, बिठूर

8 – बबलू कॉन्स्टेबल, बिठूर

अशी घडली घटना
उत्तर प्रदेशचे डीजीपी एचसी अवस्थी यांनी सांगितले की, विकास दुबेच्या विरूद्ध काही दिवसांपूर्वी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी गेले होते. पोलीस फोर्स गावाच्या बाहेर पोहचताच, तेथे जेसीबी लावण्यात आला. यामुळे फोर्सची गाडी गावाच्या आत जाऊ शकली नाही.

डीजीपी एचसी अवस्थी यांनी सांगितले की, गाडी आत जाऊ न शकल्याने सर्व पोलीस गावाच्या बाहेर उतरले. तेव्हा अगोदरच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी फायरिंग सुरू केली. पोलिसांकडून सुद्धा उत्तरादाखल फायरिंग करण्यात आली. गुन्हेगार उंच ठिकाणी होते. त्यामुळे पोलिसांना गोळ्या लागल्या. यामध्ये 8 पोलीस शहीद झाले.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना
डीजीपी एचसी अवस्थी यांनी सांगितले की, सीओ, तीन सब इन्स्पेक्टर आणि चार पोलीस शहीद झाले आहेत. 7 पोलीस जखमी झाले आहेत. घटनास्थळी एडीजीसह अनेक अधिकारी पोहचले आहेत. सोबतच फॉरेन्सिंक विभागाचे पथकसुद्धा पोहचले आहे. तसेच एसटीएफला सुद्धा घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.

डीजीपी एचसी अवस्थी यांनी म्हटले की, आता आमचा फोकस सर्व जखमी पोलीस कर्मचार्‍यांना चांगले उपचार देण्यावर आहे. तसेच विकास दुबेविरूद्ध ऑपरेशन जारी ठेवायचे आहे, जेणेकरून तो आणि त्याच्या साथीदारांना पकडता येईल. घटनेत वापरण्यात आलेल्या हत्यारांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.