जन्मापुर्वीच वडिलांचं निधन, अंगणवाडी सेविकेच्या मुलीनं प्रचंड मेहनतीनंतर मिळवलं PSI परीक्षेत घवघवीत यश

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आईच्या पोटात असतानाच वडिलांचे झालेल निधनं…पोरांना शिकविण्यसाठी अंगणवाडी मतदनीस आईचे कष्ट आणि दिवसरात्र मेहनत करुन करमाळ्याच्या संध्याराणी देशमुख या तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

संध्याराणी आईच्या पोटात असतानाच त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपलं. पण त्यानंतर शिक्षणासाठी आईने घेतलेल्या कष्टाचे चीज करत संध्याराणी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. संध्याराणीचे वडील दत्तात्रय देशमुख यांचे 1994 मध्ये निधन झाले. वडिलांचा सहवास न लाभलेल्या संध्याराणी यांच्यासह तिची मोठी बहीण विद्या अशा दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या आई निर्मला यांच्या खांद्यावर पडली.

अडचणींशी मुकाबला अन् प्रतिकूल परिस्थितीविरोधात संघर्ष करत निर्मला यांनी 2000 मध्ये गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम सुरू केले. देशमुख यांना सुरुवातीच्या काळात 500 रूपये मानधन मिळायचे. दोन मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. मोठी मुलगी विद्या हीचे लग्न झाले आहे. तिचेही शिक्षण बी.एस्सी झाले आहे. दोन्ही मुली शिकल्या पाहीजे यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करीत कष्ट केले. त्याची परतपेड संध्याराणी यांनी केली आहे. कोणताही क्लास न लावता स्वत:च अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सर्वसाधारण जागेवर मुलींमध्ये राज्यात 25 वा क्रमांक पटकावला आहे. 2016 मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अवघे तीन गुण कमी पडल्याने पद मिळाले नव्हते.

अखेर पुन्हा जिद्दीने केलेल्या प्रयत्नांना यश येवून 2018 च्या परीक्षेत 340 पैकी 225 गुण मिळवून राज्यात महिलांमध्ये 25 वा क्रमांक घेत त्यांनी बाजी मारली.’लहानपणापासून मी आईचे कष्ट पाहिले आहे. आम्हाला घरची अडीच एकर शेती आहे. मी बारावीपर्यंत आईला शेतीत काम करताना मदत करायची. मी शिकावे, मला नोकरी लागावी अशी आईची खूप इच्छा होती. पोलीस खात्याबद्दल लहानपणापासून आकर्षण होते. आईच्या कष्टांची सतत जाणीव ठेवत रात्रंदिवस मी अभ्यास करत राहिल्यामुळे यश मिळाल्याचे संध्याराणी देशमुख यांनी सांगितले. यशानंतर त्यांच्या आईसाठी आभाळ ठेंगणं झाले आहे.