कुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएस सरकारची आज विधानसभेत खरी अग्निपरीक्षा आहे. आज विधानसभेत संध्याकाळी फ्लोर टेस्ट होणार असून यामध्ये कुमारस्वामींना आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी सरकारला आज सहा वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली आहे. यासाठी काँग्रेस आणि जेडीएस सरकारने तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर जर बंडखोर १६ आमदार विधानसभेत नाही आले तर त्यांना गैरहजर मानण्यात येईल.

याआधी कर्नाटक सरकारचे संकटमोचक असलेले मंत्री डीके शिवकुमार यांनी सरकार वाचवण्यासाठी नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी एक नवीन डाव खेळला असून कुमारस्वामी यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी देखील जेडीएस तयार असल्याचे बोलले जात आहे.

कुमारस्वामी यांना मिळाली मायावतींनी साथ

दुसऱ्या बाजूला बहुजन समाज पार्टीचे एन महेश यांनी म्हटले होते कि, हायकमांडने बहुमताच्या वेळी गैरहजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मायावतींनी ट्विट करत बहुमत चाचणीच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या सूचना आपल्या आमदारांना दिल्याने कुमारस्वामींना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

१६ आमदारांचा राजीनामा

काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी बंडखोरी करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अपक्ष आमदार आर शंकर आणि एच नागेश यांनी देखील पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची चिंता वाढली. त्यामुळे ११७ सदस्य असलेल्या सरकारकडे आता फक्त १०१ मते असून सरकार अल्पमतात आहे. तर भाजपकडे सध्या १०७ आमदार असून जर बंडखोर आमदारांनी राजीनामे मागे घेतले नाही तर भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. त्यामुळे आता संध्याकाळी काय होते हे पाहणे महत्वाचे आहे.

हे चार आमदार वाचवणार कुमारस्वामी सरकार

बंडखोर आमदारांमध्ये बेंगळुरू मधून निवडून येणारे एसटी सोमशेखर, बी बासवराजू, एन मुनिरत्ना आणि रामलिंगा रेड्डी हे काँग्रेसचे चार आमदार सर्वात महत्वाचे आहेत. जर या चार आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला नाही तर आघाडी सरकार वाचण्याची संधी आहे. उपमुख्यमंत्री परमेश्वर यांच्याशी असलेल्या वादातून या चौघांनी राजीनामा दिलेला आहे जर परमेश्वरा यांनी या चौघांना समजावलं तर हे राजीनामा मागे घेऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –