कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना ‘श्वाना’ची उपमा

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची जीभ घसरली. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना श्वानाची उपमा दिली आहे. श्वान भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का ? सीमाप्रश्न हा कधीच संपला असून आता बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे विधान त्यांनी केले आहे.

बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमाला लक्ष्मण सवदी आले होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विवेकबुद्धीने विधाने करावीत, असा सल्लाही लक्ष्मण सवदी यांनी दिला आहे. चंदगडच्या आमदारांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता सवदी यांनी कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावयाचे का ? कुणी काही बोलले तरी त्याबाबत फारसा विचार करण्याची गरज नाही, असे सवदी यांनी म्हटले आहे. सवदी यांच्या या विधानामुळे सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टीका केली होती. मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करुन गोळ्या झाडल्या पाहिजेत असे विधान त्यांनी केले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/