‘कर्नाटकातील सरकार अल्पमतात’ : भाजप

बंगळूर : वृत्तसंस्था – कर्नाटकातील सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजप आमदारांनी कर्नाटक विधानसभेत केला आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने आज, बुधवारी (दि.६) विधानसभेत गदारोळ झाल्याचे दिसून आले. कर्नाटकामध्ये राजकीय संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ थंड बस्त्यात नेले. तरीही कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारवरील संकट कमी झालेले नाही.

कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झाले. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अर्थ खाते असून ते ८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज विधानसभेत राज्यपाल वजूभाई वाला यांचे अभिभाषण सुरू होते. हे सुरू असतानाच विरोधकांनी मात्र जोरदार निदर्शने केल्याचं दिसून आलं. सत्ताधारी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही. हे अल्पमताचे सरकार असल्याचा दावा करत विरोधी भाजप आमदारांनी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी व्यत्यय निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यपालांचे भाषण सुरू असतानाच, ”तुम्ही भाषण देऊ नका, तुम्ही खोटे भाषण देत आहात. ते वाचू नका, अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या. भाजप आमदारांच्या या घोषणाबाजीनंतरही राज्यपालांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

कर्नाटकात काँग्रेस-निजद आणि अपक्ष असे आमदार मिळून आघाडी सरकारचे संख्याबळ १२० होते. परंतु याआधी दोन अपक्ष आमदारांनी कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतले. यानंतर राजकीय नाट्य रंगल्याचे दिसून आले. दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढल्यानंतर काँग्रेस-निजद आघाडी सरकारचे संख्याबळ ११८ वर आले आहे.  गेल्या काही दिवसांत भाजपकडून ऑपरेशन कमळ राबविण्यात आले. मात्र, ऑपरेशन कमळ यशस्वी झाले नाही.