खडसे राष्ट्रवादीत गेले, पण न गेलेल्यांमध्ये अस्वस्थता कमी नाही !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लटपणाऱ्या पायामध्ये उसने बळ आणून लांब पळता येत नाही, उलट तसे प्रयत्न करु पाहता मध्येच म्हणजे अर्ध्यावर डाव सोडण्याची वेळ येते. राजकीय संदर्भाने बघता, राज्यातील भाजप (BJP) हाच अनुभव घेत असावा. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सोडचिठ्ठीकडे म्हणून या पक्षाने गांभीर्याने पाहायला पाहिजे. कारण खडसे पक्ष सोडून गेले असले तरी पक्षात राहूनही नाराजीने धुसमत असलेले जागोजागी कमी नाहीत.

भाजप पक्ष व त्यांचे नेते ठाकरेंच्या ठोकरेतून न सुधारता आपल्या तोऱ्यात राहिले, दखावलेल्यांना न गोंजारता ताठ्यात राहिले. त्यातूनच खडसे सारखा ज्येष्ठ व जनाधार असलेला नेता पक्षातून बाहेर पडला. अर्थात, डावले गेलेले, दुखावलेले व मनातल्या मनात तळमळत असलेल्या अनेकजण ठिकठिकाणी आहेत. जे कुचकामी ठरलेल्या निष्ठावंताना कुरवाळत अच्छे दिन येण्याची वाट बघत आहेत. मात्र, उपेक्षा व दुर्लक्षातील सातत्या टिकून असल्याने पक्षात असूनही ते अस्वस्थ आहेत. आपली नाराजी बोलून मोकळे होणारे किंवा प्रसंगी बाहेर पडणारे ठीक, मात्र, असे घरात राहून मनात धुमसणारे कुणासाठीही जास्तीचे धोकादायक असतात हे सांगण्याची गरज नाही.

पक्ष मोठा होते, पक्षाचा विस्तार होतो तेव्हा सर्वांनाच संधी देता येत नाही हे खरे असले तरी पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहेरुन आलेल्यानं डोक्यावर बसवले तर त्याच मनस्ताप अधिक जिव्हारी लागतो. भाजपमध्ये असेच झाल्याचे पहायला मिळत आहे. पक्षाच्या पडतीच्या काळात खस्ता खालेले आणि आज वंचित ठरले आहेत. ज्येष्ठता व अनुभव पाहून संधी दिली जाण्याऐवजी राजकीय गणिते मांडून व वर्ग विशेषाची मर्जी राखण्यासाठी पदे दिली जात असल्याची सल अनकांच्या मनात आहे.

एकूणच भाजपामध्ये अंतस्थ अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आहे. खडसे यांच्यासोबत फार कुणी गेले नाही, त्यामुळे पक्षाला काही धक्का बसला नाही या अविर्भावात राहता येऊ नये. पक्षात राहूनही ऐनवेळी योग्य त्या पातळीवर धक्का देऊ शकणारे कमी नाहीत. भाजपचा दीर्घकाळ सहकारी राहिलेल्या शिवसेनेला याच नाशकात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आणून दिला गेलेला नाशिककरांनी पाहिला आहे. जनता सोबत असली आणि पक्षातील सहकारी नाराज असते तर समोर दिसणाऱ्या विजयाचेही पराजयात असे रुपांतर होते हे तेव्हा दिसून आले होते.त्यामुळे पक्षातले धुमसलेपण दुर्लक्षून चालणारे नाही. खडसे यांचे पक्ष सोडून जाणे हे देखील सहजपणे घेतले जाणार असेल तर यातून आत्महघात ओढावणारचं.

स्थानिक नेतृत्त्वाचा अभाव
नाशिक भाजपामध्ये अलीकडच्या काळात सत्तेच्या अनुषंगाने अनेकांच्या नशिबी नेतृत्व आले असले तरी सर्वसामान्य नेतृत्वाचा अभाव दूर करता आलेला नाही. बंडोपंत जोशी, डॉ. दौलतराव आहेर, गणपतराव काठे यांच्या सारख्या ज्येष्ठ नेते मंडळींचा पक्षामध्ये दबदबा होता. त्यांचा शब्द अखेरचा व प्रमाण मानला जात होता. मात्र, आज त्यांच्या नंतर असे नेतृत्व नाशकात नाही की ज्याचे सर्वजण ऐकून घेतील.

You might also like