तृतीयपंथीयमध्ये एरियाचा वाद ! 55 लाखांची सुपारी दिल्यानंतर एकता जोशीची गोळ्या झाडून हत्या, खूनाचं कारण समजलं अन् पोलिसही हादरले

दिल्ली : वृत्तसंस्था – तृतीयपंथी एकता जोशी हिच्या हत्येचा प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन कुख्यात गुंडांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना हत्येचे कारण विचारले असता ते ऐकून पोलिसही दंग झाले आहेत. दोन तृतीयपंथी टोळ्यांमध्ये एरियाच्या हद्दीवरून वाद होता. त्यामुळे एका तृतीयपंथीयाने एकताचा खून करण्यासाठी 55 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात एकताची सावत्र आई आणि सावत्र भावाचा देखील समावेश होता.

गगन पंडीत आणि वरुण अशी अटक केलेल्या कुख्यात गुंडाची नावे आहेत. पोलिसांनी गगनकडून एक पिस्तुल, चार काडतुसे आणि वरुणकडून एक कट्टा आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 लाखांची सुपारी देऊन या गुंडाकडून एकताची हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला जीटीबी एनक्लेव्हमध्ये ही घटना घडली होती. हत्येनंतर हे दोघेही फरार होते. पोलिसांनी या गुंडांवर दीड लाखांचा इनाम ठेवला होता. हत्येचा दिवशी एकता स्कूटरवरून जात होती. एकताची सावत्र आई अनिता जोशी आणि सावत्र भाऊ आशिष जोशी यांच्यासोबत एका कारमधून गुंड आले होते. त्यांनी एकतावर गोळी झाडून तिची हत्या केली होती. फरार असलेले हे दोन्ही गुंड एका ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांना घेरताच त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्यूत्तरात त्यांना पकडण्यात आले. एकताचा खून करण्यासाठी तिचा प्रतिस्पर्धी असलेला तृतीयपंथी मंजूर इलाहीने गुंडाना 55 लाखांची सुपारी दिली होती. यात एकताची सावत्र आई आणि भाऊदेखील सहभागी होते. दोन तृतीयपंथी टोळ्यांमध्ये एरियाच्या हद्दीवरून वाद होता. यामुळे तृतीयपंथी सोनम, वर्षा आणि कमल, मंजूर यांनी एकताचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली होती. ठरलेल्या रकमेचे 15 लाख मिळाल्यानंतर एकताची हत्या केली होती. 55 लाख रुपये तीन टप्प्यांत देण्याचे ठरले होते.