रवींद्र जडेजा, स्मृती मानधनासह भारताच्या 5 ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना NADA ची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) करारबद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह पाच क्रिकेटपटूंना राष्ट्रीय उत्तेजन प्रतिबंधीत संस्थेनं (नाडा) नोटीस पाठवली आहे. या क्रिकेटपटूंना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात विलंब झाला म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पासवर्डमध्ये गडबडीचं कारण बीसीसीआयनं दिलं आहे. नोटीस मिळालेल्या क्रिकेटपटूंमध्ये महिला खेळाडू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय नोंदणीकृत परीक्षण पूलमध्ये (NRTP) सहभागी असलेल्या 110 क्रिकेटपटूंमध्ये या पाचही जणांचा समावेश आहे.

नाडाचे महानिर्देशक नवीन अग्रवाल यांनी सांगितले की, या पाच खेळाडूंच्या ठिकाणांची माहिती देण्यास बीसीसीआय असमर्थ राहिल्याने आम्ही ही नोटीस पाठवली आहे. Anti Doping Administration & Management Systems सॉफ्टवेअरमध्ये फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यानुसार खेळाडू स्वत: फॉर्म भरू शकतात किंवा त्यांची संघटना ते काम करू शकते. काही खेळाडू सुशिक्षित नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते त्यामुळे संघटनांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

क्रिकेटपटूंनाही हा फॉर्म भरताना अडचण येते, असे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, क्रिकेटपटू शिक्षित असतात आणि ते स्वत: फॉर्म भरू शकतात. पण त्यांच्याकडे कदाचित वेळ नसावा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ते फॉर्म भरू शकले नसतील. तर बीसीसीआयनं त्याच्या ठिकाणाची माहिती देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण मागील तीन महिन्यापासून बीसीसीआयनं माहिती का दिली नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

BCCI या प्रश्नाचं दिलेलं उत्तर योग्य वाटतेय, मात्र निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की पासवर्ड संबंधात गडबड झाली आहे आणि आता सांगत आहेत की समस्या सुटलेली आहे. यावर चर्चा होईल असेही अग्रवाल यांनी सांगितले. खेळाडूंना आपल्या ठिकाणाची माहिती देणं अनिवार्य आहे, असे तीन वेळा न केल्यास खेळाडूवर दोन वर्षाच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.