कोल्हापूरातील कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर 5 जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवदर्शन करुन घरी परतत असताना कोल्हापूरमधील कुटुंबावर काळाने घाला घातला. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक आणि ओमनी हॅनचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास कोल्हापूर पासून 25 किलोमीटर अंतरावरील आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ झाला.

कोल्हापूरमधील सुरज सुलताने हे त्यांचे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक प्रत्येक अमावस्येला निपाणी येथील तवंदी येथे देवदर्शनाला जातात. शुक्रवारी निपाणी जाण्यासाठी ओमनी व्हॅनमधून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत आई, बहीण, भाचा, भाची, बहीणीची मैत्रीण आणि शेजारी हे सर्वजण ओमनी व्हॅनमधून निपाणी येथे देवदर्शनासाठी गेले होते.

निपाणी येथून देवदर्शन उरकून घराकडे परत असताना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या ओमनी व्हॅनची धडक ऊसाने भरलेल्या ट्रकला बसली. ही धडक एवढी भीषण होती ओमनीचा पुढील भाग चक्काचूर झाला. या अपघातात व्हॅन चालवणारे सुरज सुलताने आणि श्रेया लागू यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमेधा लागू, अमृता साळवी, अनिश साळवी, आर्या कुलकर्णी, पौर्णिमा पंडीत हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरज सुलताने आणि श्रेया लागू यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. अपघाताची बातमी सजताच मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like