… अन् कॅप्टन साठे आईच्या वाढदिवसाला पोहोचलेच नाहीत

पोलिसनामा ऑनलाईन – केरळमधील कोझिकोड विमान दुर्घटनेत दीपक साठे यांचा मृत्यू ओढवला आहे. त्यांचा आईवर प्रचंड जीव होता. आईच्या 83 व्या वाढदिवसाला अचानक नागपूर गाठून तिला आश्चर्याचा धक्का देण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठीची सर्व तयारी त्यांनी करून ठेवली होती. परंतु काल नागपुरात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीपक यांनी काही दिवसांपूर्वी नातेवाईकांना आईच्या वाढदिवसाला नागपुरात येणार असल्याचे सांगितले होते. मी येणार असल्याची कल्पना आईला देऊ नका. मी अचानक तिच्यासमोर अवतरेन, असे त्यांनी सांगितले होते. परंतु हा योग काही आलाच नाही. कै. दीपक साठे यांचा जन्म नागपुरात झाला. ते सध्या मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांची पत्नी सुष्मा साठे या देखील मुंबईला असून त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा शंतनू अमेरिकेत असून त्याचे गेल्या 11 मार्च रोजी लग्न झाले तर दुसरा मुला धनंजय बंगळुरू येथे आहे. कै.साठे यांनी लॉकडाउनपुर्वी मुलाचे लग्न मुंबईत झाल्यानंतर नागपुरातील नातलगांसाठी एक पार्टी ठेवली होती. तीच त्यांची नागपूरची अखेरची भेट ठरली आहे. आई-वडील नागपुरात असल्याने त्यांची एकतरी फेरी नेहमी व्हायची अशी माहिती बहीण सुर्वणाने दिली आहे.