पत्रकारांना अरेरावीची भाषा करणार्‍या डॉ. नवलसिंग चव्हाण यांची ‘उचलबांगडी’

लासलगाव :  पोलीसनामा ऑनलाइन  –  निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांनी लासलगाव येथे पत्रकारांना अरेरावीची भाषा केल्यानंतर या घटनेची गंभीर दखल नाशिक जिल्हा परिषदेने घेतली असून या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली नाशिक येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतन काळे यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात लासलगाव येथील पत्रकारांनी शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी अरेरावीची भाषा वापरत आम्ही काशी करतो आहे इथे तुम्ही हिम्मत असेल तर घराबाहेर येण्याचे शब्द वापरले होते.
यासंदर्भात त्यांची तक्रार नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड निफाडच्या प्रांत अर्चना पठारे पंचायत समिती उपसभापती शिवा सुरासे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या तर मुख्यमंत्री कार्यालयाला देखील तक्रार अर्ज पाठविण्यात आला होता. लासलगाव प्रेस क्लबच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत तातडीने या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. दरम्यान या अधिकाऱ्याची वागणूक चांगली नसले बाबत अनेक नागरीक,कर्मचारी व अधिकाऱ्यांनी देखील यापूर्वी तक्रारी केल्या होत्या.

सोमवारी निफाड पंचायत समिती येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तडकाफडकी बदलीची कारवाई करत निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी पदी डॉ चेतन काळे यांची लेखी आदेश देत नियुक्ती केली . यावेळी पंचायत समिती उपसभापती शिवा पाटील सुराशे गट विकास अधिकारी संदीप कराड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर , व अधिकारी उपस्थित होते.