महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयितास 3 दिवसांची पोलिस कोठडी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपळगाव नजीक येथील महिला जळीत प्रकरणी प्रमुख संशयीत रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड येथील वरीष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी.काळे यांच्या समोर हजर केले असता तीन 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज तपास अधिकारी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी आज दुपारी तीन वाजता न्यायालयासमोर हजर केले व सरकारी वकील अॅड राजीव तडवी यांनी पिडितेची प्रकृती चिंताजनक असुन संशयीताकडुन लासलगाव तसेच विविध ठिकाणी तपास करणे आवश्यक आहे त्यामुळे पोलिस कोठडीची आवश्यकता आहे असा युक्तिवाद केला. न्यायालयाने सदर घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळे पिडितेचे काहीही म्हणणे असु शकते तरी शासकीय यंत्रणेने त्रयस्थ यंत्रणा म्हणून कलम 326 नुसार कलम लावावे असे निर्देश दिले. आरोपीच्यावतीने अॅड उत्तम कदम यांनी बाजु मांडली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी बाजु मांडली व पोलिस कोठडीची आवश्यकता आहे असे सांगितले.

निफाडचे पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डींनी आज सकाळी लासलगाव येथील पोलिस कार्यालयात तपासाचा आढावा घेत पोलिसांना काही सुचना केल्याचे समजते. तसेच सदर पिडिता मुंबई येथील मसीना रूग्णालयात उपचार घेत असुन तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. येवला येथे या संशयीतास नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले.