अखेर ‘गोल्डन’ लंगूरनं जीव सोडला, भारतात सर्वात दुर्मिळ होती ‘प्रजाति’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात जरी वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी असेल, परंतु आजही जंगलात प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामुळेच वन्य प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत आणि बर्‍याच प्राण्यांच्या प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या दरम्यान आसाममधील एक दुर्मिळ प्राणी नष्ट झाल्याची बातमी समोर आली आहे.

आसाममधील उमानंदा बेटात असणारे शेवटचे गोल्डन लंगूर मरण पावले आहे. आसाम मधील एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार उमानंद बेटावर एकमेव गोल्डन लंगूर शिल्लक होते, परंतु त्याचे देखील निधन झाले आहे. मात्र अद्याप त्याच्या मृत्यूमागील कारण समजू शकलेले नाही.

गोल्डन लंगूर (Trachypithecus geei) ही एक नामशेष होणारी प्रजाती आहे. हे लंगूर भूतान आणि पश्चिम आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या बेटांवर आढळत होते. परंतु हवामान बदल आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे गोल्डन लंगूर भारतातून नामशेष झाले आहेत.

एका वनविभाग अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे एक दशकापूर्वी गोल्डन लंगुरांची ब्रह्मपुत्र नदीवर लक्षणीय संख्या होती. हिरवी पाने, फळे आणि फुले खाणाऱ्या या लंगुरांना पर्यटक बिस्किटे, ब्रेड, केक्स इत्यादी खाद्यपदार्थ खाण्यास देऊ लागले. ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले होते.

तसेच एका माहिती असणाऱ्या व्यक्तीने सांगितले की बदलत्या हवामान, शिकार आणि प्रजननामुळे सोनेरी लंगुरांची संख्या कमी झाली आहे. यानंतर २०११ मध्ये केवळ पाच गोल्डन लंगूर शिल्लक राहिले होते. या ५ लंगुरांपैकी २ लंगूर वनविभागाने आसामच्या राज्य प्राणी संग्रहालयात ठेवले होते, परंतु त्यांचेही निधन झाले.