भाजपच्या रोजगार मेळाव्यात सौम्य लाठीमार, १ तरूण जखमी

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपतर्फे जिल्ह्यातील बेरोजगार मुलामुलींसाठी रोजगार मेळावा बुलडाण्यात घेण्यात आला. मात्र, नियोजनाअभावी येथे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यावेळी झालेल्या धावपळीत नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने आलेला एक तरूण जखमी झाला.

जहिरात

आगामी निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपने विविध कार्यक्रम राज्यभर घेण्याचा सपाटा लावला आहे. अशाच प्रकारे बुलडाण्यात भाजपने बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. १० वी १२ वी आणि पदवीधरांसाठी रोजगारांची संधी असून  ४१० कंपन्या या रोजगार देण्यासाठी येणार असल्याचे बेरोजगारांना सांगण्यात आले होते. यासाठी जास्तीत जास्त बेरोजगार युवकांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले होते. त्यानंतर बेरोजगार तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात हजेरी लावली. यावेळी गर्दी वाढल्याने नियोजन अपूरे पडले आणि गोंधळ निर्माण झाला. तरुणांना शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नोकरी मिळणार म्हणून जवळपास १५ हजार बेरोजगारांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. या पैकी १५५५ लोकांचीच निवड करण्यात आली. तर १३०१ लोकांना शॉटलिस्ट करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. गोंधळामुळे अनेक बेरोजगार तरूण-तरूणींना माघारी जावे लागले. पंधरा हजार बेरोजगारांपैकी केवळ दिडहजार जणांनाच रोजगाराचे आश्वासन मिळाल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागले.

वाहनचालकांना धमकावणारा मुंढव्यातील तो फलक अखेर काढून टाकला