लातूर : पोलिसांनाही कोरोनाचा विळखा ! 2 उपअधीक्षक, 9 अधिकाऱ्यासह 89 जणांना संसर्ग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील 2 पोलिस उपअधीक्षक, 9 पोलिस अधिकारी, 89 पोलीस तर 20 होमगार्डंना कोरोनाची बाधा झाली आहे. यात काहीजण होम क्वारंटाइन असून, काही जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गेल्या वर्षभरापासून लातूरकर कोरोनापासून दूर आणि सुरक्षित राहावेत म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरून बंदोबस्त करावा लागत आहे. तीन-चार महिन्यांत कोरोनाचा प्रभाव कमी होता. मात्र मार्चपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी सुरू केली आहे. कोरोना असतानासुद्धा रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमुळे पोलिसांनाही आता कोरोनाचा विळखा बसत आहे. काही दिवसांत जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असे मिळून जवळपास 120 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील 70 पोलिस होम क्वारंटाइन आहेत. याबाबत लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, पोलीस अधिकारी आणि पोलीस लातूरकरांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पोलिसही आपले बांधव आहेत हे समजून नागरिकांनी वागले पाहिजे. जबाबदारीचे भान नाही तर किमान सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.