भीषण पाणी टंचाईचा ‘लातूर’ पॅटर्न चेन्नईत ; पाण्यासाठी ‘Special’ रेल्वे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र तर भीषण दुष्काळाला सामोरे जातच आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडील एका शहराला देखील दुष्काळाच्या झळा बसत आहेत. ते शहर आहे तामिळनाडू राज्यातील चेन्नई. मागील दुष्काळात लातूर शहराला मिरजेवरून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. अगदी तशीच वेळ चेन्नई शहरावर आली आहे. केरळ राज्यातून विशेष रेल्वेने १ कोटी लिटर पाणी चेन्नई शहराला पाठवण्यात येणार आहे.

सहा महिने सुरु राहणार रेल्वे

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी सांगितले की हि रेल्वे सहा महिन्यापर्यंत सलग फेऱ्या मारणार आहे. रेल्वेतून पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने ६५ कोटी रुपये निश्चित केले आहेत. याशिवाय चेन्नई जलपुरवठा विभागाला आणि सिवेज बोर्डाला या पाणी संकटाला तोंड देण्यासाठी १५८.४२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले की, प्रतिदिन ५२.५ कोटी लिटर पाणी चेन्नईला दिले आहे. याशिवाय ८०० टँकर पाण्याची दुर्भिक्ष असणाऱ्या भागात चालू आहेत.

कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे आदेश

चेन्नई शहराची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येला केवळ सरकारकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. शहरात पाण्याचे असलेल्या संकटामुळे रेस्टोरंट आणि हॉटेल बंद केले जात आहेत. काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले आहे. चेन्नईला पाणीपुरवठा करणारे मुख्य दोन तलाव देखील कोरडे पडले आहेत.