लक्ष्मीबाई दत्त मंदिराच्या अध्यक्षपदी ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील सुमारे १२० वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या अध्यक्षपदी ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वस्त सभेमध्ये याची घोषणा करण्यात आली. ॲड. कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘विधीनिष्णात’ पदवीधारक असून ते गेली पंचवीस वर्ष पुण्यामध्ये वकिली व्यवसाय करत आहेत. तसेच सर्व्वोच न्यायालयातील वकील संघटनेचेही ते सदस्य आहेत. धर्मादाय कायद्यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थान, श्री महागणपती ट्रस्ट रांजणगाव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नवी दिल्ली येथील गांधी स्मारक निधी इत्यादी संस्थांचे ते विधी सल्लागार आहेत. ट्रस्टच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी विश्वस्तपदी ‘काका हलवाई’ चे युवराज गाडवे यांची निवड झाली. पुण्याच्या शासकीय कोषागाराचे निवृत्त अधिकारी बी. एम. गायकवाड खजिनदारपद भूषवतील.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते हे उत्सव प्रमुख पदाची धुरा सांभाळतील तर नंदकुमार सुतार यांची उप उत्सवप्रमुख पदावर निवड झाली. ज्येष्ठ विधिज्ञ व विश्वस्त ॲड. एन. डी. पाटील यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त मंडळात अंकुश काकडे, उल्हास कदम व चंद्रशेखर हलवाई यांचा समावेश आहे.

नूतन अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की गुढीपाडव्यापासून पदभार स्वीकारले जातील. मंदिरात वाढलेली भाविकांची संख्या पाहता येथील सर्व व्यवहारांचे कालसुसंगत संगणकीकरण करून जलद सेवा व पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले जाईल. मंदिराच्या धार्मिक रितीरिवाजांचे पालन करत असतानाच न्यासाच्या निधीचा अधिकाधिक सामाजिक कार्यासाठी विनियोग करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.