अमेरिकेतील बँकेत अंदाधुंद गोळीबार

वृत्तसंस्था : अमेरिकेतील फ्लोरिडा येथिल एका बँकेत अज्ञात व्यक्तीकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. झीफेन एव्हर असे या २१ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  झीफेन सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने स्वत: हून पोलिसांना फोन केला आणि बँकेमध्ये गोळीबार केल्याची माहिती दिली. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हल्लेखोराने हा गोळीबार का केला यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2017 मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जवळपास 40,000 लोकांचा मृत्यू झाला होता.