विधानसभा निवडणुकीबाबत रोहित पवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास ३ दिवसांचा कालावधी बाकी असला तरी राज्यातील प्रमुख पक्षांनी विधानसभेची तयारी चालू केल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विधानसभेबाबत मोठी घोषणा केली आहे. सृजन फाउंडेशन आणि रोहित दादा पवार मित्र परिवारातर्फे राज्यातील दुष्काळी भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व अंदाज घेऊन विधानसभेसाठी १० जूनला मतदारसंघांची घोषणा करण्याचा विचार आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी विधानसभेची तयारी सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शरद पवार यांच्याबरोबर आपल्याला रोहित पवार हे दुष्काळ दौऱ्यावर दिसून येत होते. पुण्यातील हडपसर मधून रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी देखील आग्रही मागणी समोर येत आहे, तर रोहित मात्र नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास अधिक अनुकूल आहेत.

मोदींचे ‘ध्यान’ हा वैयक्तिक विषय

दरम्यान, यावेळी त्यांना मोदींच्या केदारनाथ येथील भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले कि, ध्यान करून मनाला शांती मिळत असेल, तर हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात आपल्याला राहायचे असेल तर सर्वांनी बरोबर चालले पाहिजे असं देखील ते यावेळी म्हणाले.