भारत ‘शुक्र’ ग्रहावर अंतराळयान उतरविणार ?, योजना आखण्यास सुरूवात

पोलिसनामा ऑनलाईन : भारताने आता चंद्र, मंगळ यानंतर आता शुक्र ग्रहाकडे अधिक लक्ष दिले आहे. या ग्रहावर आपले अंतराळयान उतरविण्याची योजना भारत आखत आहे. यासाठी काही उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. यावर आता सरकारी पातळीवर शिक्कामोर्तब झाले की, भारतीय अंतराळ संस्था शुक्र ग्रहावर जाण्याची अंतिम तयारी सुरू करेल. तसे सर्वच देश पृथ्वीपासून जवळ असलेल्या शुक्र ग्रहाकडे लक्ष देत आहेत.

कार्डिफ विद्यापीठातील प्रा. जेन ग्रीव्हज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानंतर शुक्र ग्रहाभोवतीच्या ढगांमध्ये दुर्मिळ फॉस्फाइन रेणू आढळले आहेत. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या वातावरणात सजीव सृष्टी असेल का? याबद्दल चर्चा सुरू झालीय. जगभरातील अंतराळ संस्था शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात अमेरिका देशाची अंतराळ संस्था ’नासा’ आणि ’इस्रो’ या संस्था आघाडीवर आहेत. ’नासा’ने सध्या या मोहिमेचा निधी कमी केलाय. यामुळे ’इस्रो’ला शुक्रावर प्रथम जाण्याची संधी मिळू शकणार आहे. यासाठी भारताने देखील पूर्ण तयारी केलीय.

तसेच तेथील वस्तुमान अभ्यासण्यासाठी उपकरणही तयार केले आहे, असे या प्रकल्पात काम करणारे त्रिवेंद्रम येथील ’भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ संस्थचे शास्त्रज्ञ उमेश कढाणे यांनी सांगितले आहे. हा प्रकल्प पूर्ण तयार झाला असून त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 2023 मध्ये तो पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

काय आहेत संशोधनाचे निष्कर्ष?
प्रा. ग्रीव्हज यांनी सादर केलेल्या प्रबंधातील निष्कर्ष शास्त्रज्ञांना अनपेक्षित होते. त्यामुळे त्याची चर्चा झालीय. आता वातावरणात जे रेणू दिसले ते आणखी कशातून निर्माण होऊ शकतात का? यावर अगोदर संशोधन होईल, असे प्रा. कढाणे यांनी सांगितले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, हे रेणू निसर्गातील हालचालींतून बाहेर येतात. म्हणजे वीज चमकल्यावरही हे रेणू दिसू शकतात. आताच्या संशोधनात हा रेणू ग्रहावरील ढगात आढळलाय. मात्र, ग्रहाच्या पृष्ठभागावर त्याचे अस्तित्व आढळलेले नाही.

शुक्र ग्रहावर काय आहे आव्हान?
शुक्र ग्रहाची अभ्यास मोहीम हि या ग्रहाच्या विविध थरांचा, वातावरणाचा तसेच सूर्याशी येणार्‍या संबंधांचा अभ्यास करणार आहे. मात्र शुक्र ग्रह हा सूर्यापासून खूप जवळ आहे. यामुळे तेथे अंतराळयान उतरविणे हे एक आव्हान असणार आहे, असेही कढाणे यांनी सांगितले आहे.

‘या’ तीन भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग
शुक्र ग्रहावर जीवन आहे, असा अनुमान भारतीय वंशाचे डॉ. संजय लिमये, डॉ. पराग वैशंपायन, डॉ. राकेश मोगुल या तिन जणांनी 2018 मध्येच त्यांच्या प्रबंधात मांडला आहे. या आणि इतर प्रबंधांचा आधार घेत प्रा. ग्रीव्हज यांनी केलेल्या संशोधनाचे हे फलित म्हणावे लागेल. डॉ. लिमये हे अंतराळातील वातावरणाचे गाढे अभ्यासक आहेत. यात शुक्राच्या वातावरणावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. यामुळे त्यांना खगोल क्षेत्रात ’व्हीनस मॅन’ म्हणून देखील ओळखले जातंय.