‘संपूर्ण’ पुण्यातील ‘कर्फ्यू’ संदर्भात पोलिस आज अंतिम निर्णय घेणार ! मनपाकडून मात्र 7 दिवस शहर ‘सील’, सर्व रस्ते बंद

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी असताना देखील वाढती संख्या पाहता पोलिस आज ‘कर्फ्यू’ संदर्भात आज निर्णय घेणार आहेत. मात्र, पालिकेने 7 दिवस शहर सील केले असून सर्व रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. तर शहराच्या आत आणि बाहेर जाण्यास देखील बंदी घातली आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी तसे आदेश रविवारी रात्री उशिरा दिले. त्यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

शहरात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त आहे. तर, शहरात रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही शहरातील रुग्ण संख्या थांबविण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे.

पोलिसांकडून विनाकारण फिरणारे, मास्क न घालणारे तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जात आहे. परंतु नागरिक तरही वेगवेगळी कारणे देऊन बाहेर पडताना दिसत आहेत.

यामुळे शहरात पुढील 7 दिवस कर्फ्यु लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही अत्यावश्यक सेवाना देखील काही प्रमाणात रोख लावण्याची शक्यता आहे. यासोबतच परिसरातील त्या-त्या भागात वेगवेगळ्या वेळेनुसार अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू ठेवण्याबाबत पोलीस विचार करत आहेत.

त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चा सुरू आहे. रविवारी रात्री काही वेळातच याबाबतचे आदेश काढले जाणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र अचानक या निर्णयावर सोमवारी बैठक घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ। रवींद्र शिसवे यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण कडक निर्बन्ध करणार असल्याचे सांगितले होते. तसेच, संपुर्ण शहरात ‘कर्फ्यू’ लावण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते.

दरम्यान पोलीस सोमवारी निर्णय घेणार असले तरी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मात्र रविवारी रात्री 12 पासूनच पूर्ण शहर सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच शहरात प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील सात दिवस (दि. 27 एप्रिल) हे आदेश लागू राहणार आहेत. पालिकेने यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वेगळले आहे. त्या सुरूच राहणार आहे.