20 एप्रिलपासून पिंपरी चिंचवड शहरातील चिकन, मटणाची दुकाने आठवड्यातून 3 दिवसच खुली राहणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आता शहरातील चिकन आणि मटणाची दुकाने ठराविक दिवशीच खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील सर्व चिकन आणि मटणाची दुकाने दि.२० एप्रिल पासून बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच खुली राहतील. तर इतर दिवशी पुढील आदेश होईपर्यंत ही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. कॉन्टेमेंट एरिया/बॅरिगेटींग एरिया (सील) केलेल्या भागातील चिकन आणि मटणाची दुकाने पुर्णत: बंद राहतील असे आदेश महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिलेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या Covid 19 या संसर्गजन्य आजारामुळे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे. तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ प्रमाणे संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ (एपिडमिक अक्ट) मधील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चिकन आणि मटणाची दुकाने दि. २०/०४/२०२० पासून बुधवार/शुक्रवार/ रविवार सोडून इतर दिवशी पुढील आदेश होई पर्यंत बंद करणेत येत आहे. कॉन्टेमेंट एरिया/ बॅरिगेटींग एरिया यामधील चिकन आणि मटणाची दुकाने पुर्णत: बंद राहतील. यासंदर्भात सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच पोलीस आयुक्त यांना कळविण्यात आले आहे तरी सर्व दुकानदार तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले आहे.