आदिवासींवर केलेले वक्तव्य राहुल गांधींना पडले महागात, निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आदिवासींवर केलेले वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली असून ४८ तासात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील शहडोल येथे एका प्रचार रॅलीला संबोधीत करताना म्हणाल होते, ‘नरेंद्र मोदी यांनी एक नवीन कायदा केला आहे, आदीवासींना थेट गोळ्या घालण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत. आदीवासींकडून जमिन आणि नैसर्गिक साधने हीरावून घेण्याचा अमर्याद अधिकार सरकारला मिळाला आहे, या अधिगृहणाला विरोध करणा-यांना थेट गोळ्याच घालण्याची तरतूद केली आहे’. राहुल गांधी यांचे हे वक्तव्य आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या सारखे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेत राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या भाषणाची टेप मागवून घेतली होती. त्यानुसार आयोगाने राहुल गांधी यांनी नोटीस पाठवून ४८ तासात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अहमदाबाद येथील एका न्यायालयाने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठवलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये अमित शहा यांचा उल्लेख एका खून प्रकरणातले आरोपी असा केला होता. त्यावरून कृष्णवदन ब्रह्मभट या भाजपा कार्यकर्त्याने राहुल गांधी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

अमित शहा यांची सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणात सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे अमित शहा यांचा खून प्रकरणातील आरोपी असा उल्लेख करणे चुकीचे असल्याचे तक्रारदाने तक्रारीत म्हटले आहे. यावरून गुजरात कोर्टाने राहुल गांधी यांना समन्स पाठवले आहे.