लोकसभा निवडणूक : शरद पवारांकडून स्व:ताची उमेदवारी घोषित

टेंभुर्णी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची लोकसभेची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून शरद पवार यांच्या उमेदवारी बाबत लावल्या जाणाऱ्या तर्क वितर्काला आता पूर्णविराम मिळाला आहे. माढा मतदारसंघातील टेंभुर्णी येथील सभेत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला आपण दुजोरा देण्याचे ठरवले आहे असे म्हणत उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

आज शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या घरी जेवण केले तसेच यावेळी त्यांच्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी टेंभुर्णी येथे जाहीर सभेला संबोधित करताना आपल्या उमेदवारी बाबत भाष्य केले आहे. आता माढ्यातून शरद पवार लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी शरद पवार लोकसभेची निवडणूक लढत असल्याचे राजकीय जाणकारांनी या पूर्वीच म्हणले होते. त्याच निदानाला शरद पवार यांच्या उमेदवारीने दुजोरा मिळाला आहे. शरद पवार यांचा आम्ही पराभव घडवून आणू असे भाकीत वर्तवणारी भाजपा त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार देते हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

शरद पवार यांच्या मनाचा कोणालाच थांग आज तगायत लागला नाही. आपण सार्वत्रिक निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केलेल्या शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक बॉम्ब टाकला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या पक्षातील स्वकीयांना हि थक्क केले आहे.

पक्षात गटबाजीचे राजकारण फोफावत आहे असे दाखवून त्या गटबाजीला संपवायला आपणासच तिथे उमेदवारी करणे भाग आहे हि शरद पवारांची भूमिका १० वर्ष जूनी आहे. अर्थात २००९ साली शरद पवार यांनी अशीच पक्षांतर्गत गटबाजी वाढीस लागल्याची सबब देत लोकसभा निवडणुकीत माढ्याची उमेदवारी स्वतःकडे घेतली होती. तशाच प्रकारची खेळी शरद पवार यांनी या वेळी उमेदवारी स्वतःकडे ठेवण्यासाठी केली आहे.आता शरद पवार यांची लोकसभेची वाट रोखण्यासाठी भाजप माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

शिंगावर घेणे हा आमचा खाक्या ! शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरेंचा ठाकरी बाणा