भाजपच्या घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून केवळ घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मदत काहीच होत नाही असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजप सरकारची कारवाई शून्य आहे. त्यांच्या काळात कुपोषण वाढले आहे असा आरोप देखील चव्हाण यांनी केले आहेत. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम देखील उपस्थित होते.

एमआयएमबरोबर आघाडी नाही

यावेळी बोलताना, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेसची बोलणी सुरू असल्याची माहिती देताना त्यांनी एमआयएमबरोबर कोणत्याही परिस्थितीत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

सत्तास्थापनेनंतर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला किमान वेतनाची हमी देण्याची ऐतिहासिक घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. नाकर्त्या मोदी सरकारने निर्माण केलेल्या गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने हे ऐतिहासिक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने नेहमीच दिलेली आश्वासने पूर्ण केली.

पण भाजपा मात्र केवळ घोषणा करतात. प्रत्यक्षात मदत काहीच करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपाकडून सध्या होत असलेल्या घोषणा म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर ‘चुनावी जुमला’ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.आगामी निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून यावर लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.