माढा मतदार संघाबद्दल शरद पवार पुनर्विचार करणार काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे शरद पवार यांनी स्वतः जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या लोकसभा उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात आज सोमवारी पुण्याच्या बारामती हॉस्टेलवर बैठक देखील पार पडली आहे. परंतु शरद पवार माढ्यातून माघार घेणार का या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळाले नाही.

शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याच्या बाबत मोठा निर्णय मागील काही दिवसापूर्वी जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी त्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मतदारांचा कानोसा देखील घेतला होता. तसेच माढा मतदारसंघात आपल्या पक्षातील नेत्यांची नेमणूक करून अहवाल देखील मागवला होता. या अहवालातून मात्र शरद पवार यांच्या नावाला माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सामान्य जनता विरोध करत होती असाच एकंदर सूर होता. याच बाबीचा सारासार विचार करून शरद पवार यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा असे सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट होते.

माढा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत येते आहे. त्याच प्रमाणे त्यांचे पुत्र रणजितसिंह यांचे देखील नाव समोर येते आहे. शरद पवार यांनी आज बारामती हॉस्टेलवर बोलावलेल्या बैठकीला मोहिते पाटील पितापुत्र देखील उपस्थित होते. कदाचित या बैठकीत दोघांपैकी एकाच्या नावावर उमेदवारीचा निर्णय झाला असावा अशी शक्यता आहे.त्यामुळे आगामी काळात माढ्याचे बदलेले चित्र पाहण्यास मिळू शकते. तसेच शरद पवार माघार घेऊन मावळ मधून पार्थ पवार यांचे नाव जाहीर करणार असल्याचे बोलले जाते आहे. पवार कुटुंबातील तीन उमेदवार लोकसभेला उभे केले असते तर घराणेशाहीच्या नावाने पक्षाला घेरले असते म्हणून शरद पवार यांनी माघार घेतली असावी अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.