‘आयात’ उमेदवाराची धास्ती : कार्यकर्त्यांची उणीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- एरवी कोणत्याही मुद्दयांवर एकमत न होणारे शहर काँग्रेसचे स्थानिक नेते लोकसभेसाठी ‘आयात’ उमेदवाराच्या धास्तीने एकवटले असले तरी गटबाजीमुळे विखुरलेले कार्यकर्ते एकवटणार का ? हाच प्रश्न सध्या काँग्रेसच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यातही लोकसभेच्या रिंगणात कोण उतरतो? यापेक्षा आगामी विधानसभेची सूत्रे दुसऱ्याच्या हाती नको यासाठीच आता अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा  फैसला पक्षश्रेष्ठी करणार असले तरी भाजपकडून ऐनवेळी कोणता उमेदवार रिंगणात उतरविला जाईल यानुसार रणनीती ठरवली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गटातटाच्या राजकारणात एकमेकांना ‘ पाण्या’त पाहणारे शहर काँग्रेसचे स्थानिक नेते आता एकत्र आले आहेत.’आयात’ उमेदवाराच्या धास्तीने गटतट संपुष्टात आणून संघटित निवडणूक लढविण्याची ग्वाही आता पक्षश्रेष्ठींना  दिली जात आहे.  त्यासाठी निष्ठावंतांनाच  उमेदवारी द्या असे ‘साकडे’ घातले जात आहे;पण या कृतीलाच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वर्तुळातून आक्षेप घेतला जात आहे. पालिका निवडणुकांवेळी एकमेकांना शह देण्याच्या राजकारणात काँग्रेसची अवस्था काय झाली याकडेही आता लक्ष वेधले जात आहे. स्वतःच्या अस्तित्व आणि वर्चस्वाच्या लढाईत स्थानिक नेत्यांमुळे पक्षाचीच  वाताहत  झाली . पूर्वी ९० वर असलेली नगरसेवकांची संख्या आजमितीस कितीवर आली आहे ? हा प्रश्नही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यात राष्ट्रकुल स्पर्धेवरून तत्कालीन खासदार सुरेशभाई  कलमाडी वादग्रस्त ठरले, पक्षातून निलंबित झाले ;पण एकेकाळी शहरात काँग्रेसचे वर्चस्व अबाधित ठेवणाऱ्या ‘सबसे बडा खिलाडी’ असणाऱ्या कलमाडीनंतर पक्षाची जी वाताहत झाली ती सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग करूनही सावरता आली नाही.केवळ गटबाजीमुळे पक्षाला जी घरघर लागली ती आजमितीस कायम आहे मग आता एकदिलाने काम करण्याची ग्वाही कशाच्या आधारे देत आहात,असा सवालही शहर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी करीत आहेत.

सद्यस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे किती भक्कम आहे याचा लेखाजोखा आधी मांडा मग एकदिलाची, गटबाजी विरहित निवडणूक लढविण्याची भाषा करा असा उपरोधिक टोलाही  पक्षाच्या वर्तुळातून लगावला जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गटबाजी आहे . त्यात गत पालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांची उणीव पक्षाला भासत आहे. एकाच मतदारसंघात दोन – तीन स्थानिक नेते नेहमी  एकमेकांसमोर उभे ठाकत असल्याने त्यांचे कार्यकर्ते  एकत्र कसे येणार या मुद्द्याकडेही लक्ष वेधले जात आहे.

पुण्याच्या जागेवर प्रारंभी राष्ट्रवादीने दावा ठोकला आणि सक्षम उमेदवाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या  काँग्रेसला  आता ‘आयात ‘ उमेदवारीच्या धास्तीने ग्रासले आहे. ‘मनी- मसल पॉवर ‘ मुळे एका तगड्या उमेदवारामागे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटू शकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात राष्ट्रवादीची विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची  मोर्चेबांधणी प्रभावी ठरेल अशी वास्तवता आहे.भाजपमधील रस्सीखेचमध्ये कुणाला उमेदवारीची ‘ लॉटरी ‘ लागेल  या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसला आयात उमेदवाराबरोबरच कार्यकर्त्यांची फौज कशी उभी करायची आणि अस्तित्व राखायचे  हीच धास्ती असल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे.