रत्नागिरी-सिंधुदुर्गात लोकसभेच्या गडावर पुन्हा फडकला ‘भगवा’ ; विनायक राऊत ‘एवढ्या’ मतांनी विजयी

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विनायक राऊत यांनी बाजी मारली. या मतदार संघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहूजन आघाडी कडून मारुती रामचंद्र जोशी, आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीत विनायक राऊत हे १,७७,३८७ एवढया दणदणीत मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या राऊत यांना ४,५६,०१३ एवढी, तर महाराष्ट्र स्वाभिमानीच्या निलेश राणे यांना २,७८,६२६ एवढी मते मिळाली. या मतदार संघात १४ लाख ५४ हजार ५२५ मतदार आहेत. त्यापैकी ८९७२४९ मतदारांनी मतदान केले होते.

विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. राजापूरमध्ये येऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला त्यांनी कडाडून विरोध केला. १९९९-२००४ मध्ये विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून विधासभा निवडणूक लढली आणि ते विलेपार्ले येथून आमदार म्हणून निवडून आले. २०१२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. २७ मे २०१४ रोजी त्यांनी विधानसभेतील पदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून उभे राहिले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. आता निलेश राणे या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातील नाणार प्रकल्पाचा मुद्दा गाजला. त्यामुळे याचा फायदा थेट शिवसेनेला झाला अशी चर्चा आहे . शिवसेनेची सत्ता या मतदार संघातून उलथवून टाकण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. यातच निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे जुने मुद्दे उखडून काढले. त्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण अखेर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी विजय मिळवला.