‘लव्ह-सेक्स-धोका’ अन् ‘असा’ झाला शेवट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन : लग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी संशयितास बुधवारी (ता.३) अटक करण्यात आली असून या आरोपीचे नाव दिनेश खरात असे आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संबंधित मुलगी घरात टीव्ही पाहात होती व तिची आई घरकाम करत होती. दहा मिनिटानंतर मुलगी घरात नसल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने शेजारी पाजारी तिचा शोध घेतला परंतु ती आसपास कुठेच सापडली नाही. तसेच नातेवाईकांकडे देखील शोध घेतला परंतु मुलगी कुठेच सापडली नसल्याने मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान १९ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडितेने आपल्या आईसोबत जबाब दिला आहे.

ओळख, प्रेम अन्‌ अत्याचार…
पिडीतेच्या जबाबानुसार, आरोपीचे नाव दिनेश असून, एका वर्षांपासून त्या दोघांची ओळख होती. या काळात आरोपी तिच्याशी सतत फोनवर बोलत होता आणि तिला आपल्या प्रेमात फसवून लग्नाचे आमीष दाखवत होता. या खोट्या भूलथापांना मुलगी बळी पडली आणि आरोपीने मुलीला १६ नोव्हेंबर रोजी हर्सूल टी पॉईंट येथे बोलावले. मुलगी तेथे पोहोचल्यावर त्याने तिला एका पडक्‍या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीला त्याचा मामा भेटला व त्याने दोघांना कन्नडला नेले आणि आरोपीने मुलीला १८ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास तिला बाबा पेट्रोल पंपाजवळ सोडले. या दरम्यान मुलगी खूप घाबरली होती. घरच्यांच्या भीतीमुळे ती दिवसभर शहरात इकडे तिकडे फिरत होती. शेवटी ती रात्री नऊच्या सुमारास घरी पोहोचली.

आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आले असून त्याच्यावर पोस्को आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, शनिवार (ता.७) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले आहेत. आरोपीने मुलीला कुठे-कुठे नेले त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन तपास करणे, आरोपीने वापरलेल्या वाहनाची जप्ती, तसेच या प्रकरणात अजून कोण कोण शामिल आहे याबाबत तपास करण्यासाठीची मागणी सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी न्यायालयात केली असून जोपर्यंत या बाबींचा तपास होत नाही तोपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती देखील वकिलांनी केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून आरोपीस शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.