UP : 50 पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती, योगी सरकारनं घेतला निर्णय

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याची कारवाई सुरु केली आहे. अशा भ्रष्टाचारी पोलिसांची यादी पाठवण्यासाठी पोलीस महासंचालक मुख्यालयाने सर्व पोलीस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि एडीजी झोनच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. पत्रात 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॉस्टेबल ते पोलीस निरीक्षक या रँकमधील पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल.

दुसरीकडे योगी सरकारच्या या मोठ्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील पोलिसांमधील भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. ज्या पोलिसांनी 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पार केलेली आहेत, त्यांना घरी बसवलं जाऊ शकतं.

सरकारने यादी तयार करण्याचे दिले आदेश

लवकरच उत्तर प्रदेश सरकार 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अपेक्षेनुसार काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल. मुख्य सचिव आर.के. तिवारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव आणि सर्व विभागांच्या सचिवांना वयाची 50 वर्षे ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सांगितले आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादीही तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारनेही सक्तीची सेवानिवृत्ती दिली होती

मिळालेल्या माहितीनुसार, भ्रष्ट अधिकाऱ्यांची ओळख पटवली जात आहे, ज्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल. यामध्ये 17 समीक्षा अधिकारी, 8 विभागातील अधिकारी, 3 सचिव आणि 2 उपसचिवांचा समावेश आहे. मागील तपास, त्यांच्यावर दाखल केलेल्या कारवाई आणि फौजदारी खटल्यांचा तपशील गोळा केला जात असून जेणेकरून त्यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध होऊ शकतील. यापूर्वी केंद्र सरकारने 15 वरिष्ठ आयटी अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले होते.