बस आणि रिक्षा यांच्यातील भीषण अपघातात 13 ठार

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ऑटो रिक्षा आणि बस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार झाले असून ३ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी झालेल्या या अपघातात ९ महिला आणि ऑटो रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ऑटो रिक्षामध्ये १३ लोक खच्चून भरले होते. त्यात प्रामुख्याने महिला होत्या. एका कार्यक्रमासाठी जेवण बनवण्यासाठी या महिला जात होत्या. यावेळी मुरैनाहून भरधाव आलेल्या बसने रिक्षाला जोरात धडक दिली. त्यात १० जण जागीच ठार झाले. मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृताबद्दल शोक व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये नुकसान भरपाई तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.