थंडीनं कुडकुडत होता भिकारी, DSP नं जवळ जाऊन पाहिलं तर दिसला स्वतःच्या बॅचचा पोलिस अधिकारी

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – अनेकदा जे चित्र समोर असते, त्याच्या पाठीमागे सत्य काही तरी वेगळेच असते. भिकारी नसून आपल्याच बॅचचा अधिकारी असतो आणि जेव्हा ही गोष्ट 10 वर्षांनंतर डीएसपीच्या समोर येते, तेव्हा त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नसतात. एखाद्या चित्रपटासारखी ही कथा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये समोर आली. जेथे आपल्या गाडीने जात असलेल्या डीएसपीने थंडीने कुडकुडत असलेल्या भिकार्‍याला पाहिले आणि ते गाडी थांबून त्याच्या जवळ गेले, तेव्हा आढळले की, तो समोर असलेला भिकारी नसून, आपल्याच बॅचचा ऑफिसर आहे.

ग्वाल्हेर पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिह भदौरिया झांसी रोडने निघाले होते. ते दोघे बंधन वाटिकेच्या फूटपाथच्या येथून जात असताना रस्त्याच्या कडेला एक अर्ध्या वयाचा भिकारी थंडीने कुडकुडताना दिसला. हे पाहून दोन्ही अधिकार्‍यांनी गाडी थांबवली आणि मदतीचा प्रयत्न केला. रत्नेश यांनी आपले शूज आणि डीएसपी विजय सिंह भदौरिया यांनी आपले जॅकेट त्याला दिले. यानंतर जेव्हा दोघांनी त्या भिकार्‍याशी बोलणे सुरू केले, तेव्हा दोघांना धक्काच बसला. तो भिकारी डीएसपीच्या बॅचचा अधिकारी निघाला.

10 वर्षांपूर्वी झाला होता बेपत्ता
प्रत्यक्षात भिकार्‍याच्या वेषात मागील 10 वर्षांपासून बेवारस स्थितीत फिरत असलेले मनीष मिश्रा एकेकाळी पोलीस अधिकारी होते. इतकेच नव्हे, ते शार्प शूटरसुद्धा होते. मनीष यांनी 1999 मध्ये पोलीसची नोकरी जॉईन केली होती. ज्यानंतर एमपीच्या विविध पोलीस ठाण्यात काम केले. त्यांनी 2005 पर्यंत पोलीसची नोकरी केली. शेवटच्यावेळी ते दतियामध्ये पोलीस ठाणे प्रभारी होते. परंतु, हळूहळू त्यांची मानसिक स्थिती खराब होत गेली. घरातील लोक त्यांच्यामुळे त्रस्त होऊ लागले. उपचारासाठी इकडे-तिकडे नेण्यात आले, परंतु एक दिवशी ते कुटुंबीयांची नजर चुकवून पळाले.

खूप शोधल्यानंतरही त्यांचा शोध लागला नाही. यानंतर त्यांची पत्नीसुद्धा त्यांना सोडून गेली. नंतर पत्नीने घटस्फोट घेतला. इकडे हळूहळू मनीष भीक मागू लागले. आणि भीक मागता-मागता सुमारे दहा वर्षे सरली.

दोन्ही डीएसपी सहकार्‍यांनी सांगितले की, मनीष त्यांच्यासोबत 1999 मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर भरती झाले होते. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की, मनीष एक दिवस त्यांना अशा अवस्थेत सापडेल.

डीएसपी मित्रांनी सुरू केला उपचार
दोघांनी मनीष सोबत जुन्या दिवसांबाबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परंतु, मनीष सोबत जाण्यास तयार झाले नाहीत. यानंतर दोन्ही अधिकार्‍यांनी मनीषला एका समाजसेवी संस्थेत पाठवले. तिथे मनीषची देखभाल सुरू झाली आहे.

डीएसपी मनीष यांचे भाऊसुद्धा इन्सपेक्टर आहेत आणि वडील आणि काका एसएसपी पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची एक बहीण एक दूतावासात चांगल्या पदावर कार्यरत आहे. मनीष यांची पत्नी, जिने त्यांच्याशी फारकत घेतली आहे, ती न्याय विभागात चांगल्या पदावर आहे. सध्या मनीषच्या या दोन मित्रांनी त्याच्यावर उपचार सुरू केला आहे.