बंग विजयासाठी महामंथन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची) “बंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत आणि विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठीच नव्हे तर भाजपेयींसाठी आणि तृणमुल काँग्रेससाठीही अस्तित्वाचा आहे. वंगभूमीतल्या यशपयशानं एकाला ‘सत्तासंजीवनी’चं अमृत मिळणार आहे तर दुसऱ्याला सत्तास्वप्नभंगाचं विष! आज प्रधानमंत्री बनण्याच्या आवेशात ममतादीदीं रणांगणात उतरल्या आहेत! त्यासाठीची त्यांची चौफेर फटकेबाजी सुरु आहे, तर मोदी-शहा अभिमन्युच्या त्वेशानं ममतादीदींच्या महागठबंधन चक्रव्यूहात शिरलेत. आगामी काळात वंगभूमी ही सतासंपादनासाठीचे समरांगण बनेल. देशाची सत्तासुत्रे यापुढील काळात कुणाच्या हाती जाणार आहेत? मोदी, राहुल की ममतादीदी? हे ठरणारं असल्यानं देशभरातल्या राजकीय निरीक्षकांच लक्ष बंगालच्या घडामोडींकडे लागलेलं आहे!”
—————————————————–
भा जपेयींच्या मेळाव्यात अमित शहा यांनी भाषण करताना, ‘ही अस्तित्वाची लढाई आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला अन देशावर दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य आलं, आज तशीच वेळ आलीय….तेंव्हा जागे व्हा,लढ्याला सिद्ध व्हा,’ असं म्हटलं होतं. पण ती लढाई पंजाबात झाली होती. आज मात्र ती बंगालच्या रणभूमीत ‘बंगभूमीत’ खेळली जातेय. २५० वर्षांपूर्वी प्लासीची लढाई हिंदुस्थानचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरली होती. आता तीच बंगभूमी म्हणजेच बंगालमधील लोकसभेच्या निवडणुका ह्या नव्या लढाईचं, सत्तासंघर्षाचं कारण ठरलंय. प्लासीच्या त्या युद्धात एकेकाळी इथं सिराज उदौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह होते. आताच्या या सत्तासंघर्षाची ही लढाई मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आहे. फक्त नावं बदललीत. युद्धाचा प्रकार बदललाय. मैदानही तेच आहे अन हे युद्ध देखील त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक असं आहे! पण या युद्धात, लोकसभा निवडणुकीतील यशापयश ठरविणाऱ्या युद्धाचा प्रारंभ झाला होता तो फक्त १५ पैशाच्या sms पासून!

वितुष्टता टाटांच्या नॅनो प्रकल्पातून
वर्ष होत २००७…. फक्त एक लाख रुपयात मध्यमवर्गाला परवडेल अशी छोटी कार बनविण्यासाठी टाटा कंपनी बंगालच्या सिंगुर जिल्ह्यात प्रकल्प उभा करीत होती. राज्य सरकारकडून मजुरांचं वेतन आणि इतर मागण्यांसाठी वारंवार टाटांच्यासमोर अडचणी उभ्या केल्या, त्यासाठी कडक इशारे, धमक्या देण्यात आल्या. त्यासाठी उग्र आंदोलने झाली, जाळपोळ झाली. यामुळं त्रासलेल्या टाटांनी प्रकल्प सिंगुरमधून हलविण्याचा इरादा जाहीर केला. अगदी त्याच क्षणाला ही संधी साधून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी टाटांना एक साधा sms पाठवला होता. ‘वेलकम तो गुजरात!’ त्यानंतर लगेचच रतन टाटांनी नॅनो मोटर्सचा प्रकल्प गुजरातेत घेऊन जात असल्याची घोषणा केली. हा टाटांचा महत्वाकांक्षी आणि देशभरात प्रतिष्ठित समजला गेलेला हा प्रकल्प बंगालच्या हातातून गुजरातने हिसकावून घेतला. अशी चर्चा प्रसिद्धीमाध्यमातून झाली. याशिवाय बंगालमधील कामगारांचा रोजगार ममता बॅनर्जींनी घालवला अशी जहरी टीकादेखील झाली. तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात वितुष्ट, ईर्षा आणि शत्रुत्व याचं बीज रोवलं गेलं. ते आज फोफावलंय!

मोदी आणि ममता यांच्यात साम्य आढळतं
एकमेकांचे कट्टर शत्रुत्व निर्माण झालेल्या नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात विलक्षण साम्य आढळतं. नरेंद्र मोदी हे सर्वसाधारण कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील वडनगर रेल्वेस्थानकावर चहा विकत. तिथं नरेंद्र मोदीही चहा विकत असं सांगितलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ प्रचारक म्हणून भाजपत ते सक्रिय बनले. महामंत्री म्हणून ख्यातकीर्त झाल्यानं त्यांना गुजरातच्या बाहेर जाणं भाग पडलं. पुन्हा त्यांनी आपल्या बळावर सत्तेच्या राजकारणात येऊन देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व त्यांनीसिद्ध केलं. स्वतः निर्माण केलेलं गुजरात मॉडेल देशातील लोकांपुढे ठेऊन प्रधानमंत्री होण्यापर्यंतची त्यांनी मजल मारलीय. तशाचप्रकारे ममता बॅनर्जी यांची पार्श्वभूमी देखील निम्नमध्यमवर्गीय अशीच आहे. वडील स्वातंत्र्यसैनिक होते. पण त्याचं निधन लवकर झाल्यानं कुटुंबाची सारी जबाबदारी ममतांवर आली. त्यावेळी त्यांनी दूध विकण्याचा व्यवसाय केला. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ममतांनी देखील मोदींप्रमाणे आपल्या परिवाराला,नातेवाईकांना आपल्यापासून, लाईटलाईमपासून दूर ठेवलंय. मोदींनी आपल्या पत्नीचा त्याग करून आपलं जीवन राजकारणाला समर्पित केलंय. ममता या देखील आजीवन अविवाहित राहिल्यात. काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्या डाव्यांच्या विरोधात लढत होत्या. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळं त्यांना दोनदा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शेवटी कंटाळून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. डाव्यांच्या विरोधात लढून त्या मुख्यमंत्री बनल्या. आज देशातील विविध २३ राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणून प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत त्या उतरल्या आहेत.

मोदी जसे जिद्दी तशाच ममता हट्टी !
मोदी आणि ममतादीदीं यांच्यात खूप गोष्टी साम्य आढळतं. नरेंद्र मोदी जितके जिद्दी समजले जातात तितक्याच ममता बॅनर्जी यादेखील हट्टी असल्याचं दिसून आलंय. मोदी हे त्यांच्या विरोधकांना कधी माफ करत नाहीत. वेळ आली की, त्याचा काटा काढतात. तर ममता या देखील जुनी शत्रूता कायम लक्षांत ठेऊन वागतात. मोदी सत्ता अत्यंत कडक शिस्तीनं राबवतात. तर ममता हाती हंटर घेऊन सत्ता कशी चालवावी हे चांगलंच जाणतात. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षांत पर्याय नाही, किंबहुना तो तयार होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ते दोघेही आपापल्या प्रांतात खूपच लोकप्रिय आहेत.

भाजपेयींनी दीदीला अंगणातच घेरलंय
२०१४ मध्ये भाजपेयींनी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मोदींचं नाव जाहीर केलं, त्यानंतर देशात मोदींची लाट निर्माण झाली. तरीदेखील ज्या राज्यातून भाजपेयींना प्रतिसाद लाभला नाही अशा राज्यात बंगाल हे राज्य होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक असले तरी स्वातंत्र्यानंतरचा इतिहास असा आहे की, बंगालमध्ये कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ अन भाजप यांना समर्थन मिळालं नाही. तिथल्या लोकांनी तिथं त्यांना स्वीकारलंच नाही. लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या बंगालमध्ये भाजपनं ममतांना हरवण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला. मतांचं ध्रुवीकरण करण्यात माहीर असलेल्या अमित शहा यांनी मुरशिदाबाद, २४ परगणा इथं झालेल्या जातीय दंगलीचा राजकीय फायदा घेण्याची व्यूहरचना आखली होती. ममतांनी देखील भाजपचा अश्वमेघ रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळं निवडणुकीचे निकाल ममतांच्या बाजूनं लागला आणि ४२ पैकी ३४ जागा जिंकल्या आणि भाजपला केवळ २ जागा मिळवत्या आल्या. पण भाजपेयींचं हे देखील यश खूप महत्वाचं होतं. जिथं एक तृण देखील हाती लागत नव्हतं तिथं नंदनवन फुलण्यासारखं हे यश असं भाजपेयीं समजतात त्यामुळं त्यांनी इथं लक्ष केंद्रीत केलंय. बंगालमधली ही फलद्रूपता पाहून भाजपेयींनी इथं गेली साडेचार वर्षे सतत आक्रमकता कायम ठेवली. त्यामुळं मोदी आणि ममता यांच्यातील वैमनस्य याकाळात आणखीनच वाढीला लागलं.

नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींसाठी अस्तित्वाचा सवाल !
२०१९ मध्ये होणारी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका ह्या दोघांसाठीही निर्णायक ठरणार अशाच आहेत. निवडणुकांनंतर केंद्रात सत्ता कुणाची येणार याचाही निर्णय बंगालमध्येच लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळंच इथं स्फोटक परिस्थिती निर्माण झालीय. उत्तरप्रदेशसहित हिंदीभाषिक पट्ट्यात भाजपसाठी आजतरी परिस्थिती थोडी कठीण आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड इथली सत्ता भाजपेयींनी गमावली आहे. तर उत्तरप्रदेशात बसपाच्या मायावती आणि सपाच्या अखिलेश यादव यांनी युती करून भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरात आणि महाराष्ट्र इथं देखील थोडंफार नुकसान होण्याची शक्यता दिसून येतंय, याची जाणीव भाजपेयींना झालीय. यावेळी संसदेची सत्ता हाती घेण्यासाठी २७२ ही सदस्यसंख्या गाठणं गरजेचं आहे. त्यामुळं भाजपेयींनी ज्या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यात बंगालमधील लोकसभेच्या २५ जागा आणि ओरिसातील १५ जागा अशा ४० लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजपेयींनी इथं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे अन्य राज्यात होणारे नुकसान काही प्रमाणात इथं भरून निघेल, असा भाजपेयींचा होरा आहे. पण ते जर शक्य झाले नाही तर मात्र २०१९ मध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपसमोर महामुश्कीली उभी राहील.

पूर्वेकडील राज्ये भाजपेयींचं लक्ष्य !
भाजपला अचानक काही बंगालमध्ये रस निर्माण झालेला नाही. सीबीआय-ममतांच्या पोलिसांचा झगडा हा एक बहाणा आहे. भाजपनं पूर्वेकडील राज्याच्या १२३ जागांसाठी मिशन आखलं आहे. त्यासाठी त्यांचे पाच विभाग नेमून त्याचे स्वतंत्र प्रभारी नेमलेत. १२३ पैकी बंगाल आणि ओरिसात ७७ जागा आहेत. २०१४ मध्ये या ७७ पैकी १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. इथं झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपेयींनी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकत मुसंडी मारलीय. या यशानं भाजपेयीं उत्साहित झालेत तर ममतादीदीं बिथरल्या आहेत. भाजपचं अक्राळविक्राळ आणि विकट रूप त्यांच्यापुढं उभं ठाकलंय! त्यामुळं इथं तृणमूल काँग्रेसचा कस लागणार आहे.

ममता प्रधानमंत्रीपदाच्या दावेदार ठरताहेत
ममतादीदींनी आपलं घर मजबूत करण्याचा प्रयत्न चालवलाय. बंगालमध्ये भाजपविरोधी वातावरण निर्माण करतानाच आपले सारे पत्ते त्या खेळताहेत. यावेळी तर स्वतःला महागठबंधनचं नेतेपद आणि प्रधानमंत्रीपद मिळविण्याच्या प्रयत्नात त्या आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात संसदेत त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता प्रसिद्धी माध्यमातून वर्तविली जातेय. असं घडलं तर मात्र बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस तिसरी आघाडीच्या वतीनं ममतांना प्रधानमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी ममतादीदींना आपल्या राज्यात बंगालमध्ये ४२पैकी कमीतकमी ३०-३५ जागा जिंकायला लागतील. बंगालमधील यापूर्वी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट हे दोन प्रमुख विरोधी पक्ष ममतादीदींसमोर होते पण आता भाजपेयींचं जबरदस्त आव्हान उभं ठाकलंय. भाजपेयीं आणि तृणमूल काँग्रेस दोन्हीही पक्ष प्रतिस्पर्धी अस्तित्वाची लढाई खेळताहेत. त्यांच्यातील हे युद्ध जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा झगडा अधिक तीव्र होत होईल.

कहीपे निगाहे, कहीपे निशाणा !
केंद्रातील सत्ता मिळवण्याचा मार्ग हा उत्तरप्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. उत्तरप्रदेशातून जे लक्षणीय यश २०१४ मध्ये भाजपेयींना मिळालं होतं तसं यश मिळण्याची शक्यता आता दिसत नाही. ७२ खासदार मिळवलेल्या भाजपला सपा-बसपा युतीनं आव्हान उभं केलं आहे तर काँग्रेसनं प्रियांका गांधी वाद्रा यांना इथं उतरवलंय. परिणामी इथं कमी जागा मिळतील असं लक्षात आल्याने पूर्वेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित केलंय. राष्ट्रीय स्तरावर असलेल्या काँग्रेस आणि राहुल-प्रियांका यांचा प्रभाव देशभर सर्वत्र आहे. तर ममतादीदींचा केवळ बंगाल पुरताच राहिलाय. भाजपेयींच्या समोर जर काँग्रेस हा प्रधानमंत्रीपदाचा दावेदार राहिला तर त्यांना देशभरातून प्रतिसाद लाभू शकतो, ते मोठं आव्हान भाजपेयींसमोर असेल. तीच मोठी अडचणदेखील ठरेल! पण ममतादीदी ह्या महागठबंधनाच्या माध्यमातून प्रधानमंत्रीपदाच्या दावेदार बनल्या तर त्यांचा प्रभाव हा केवळ बंगाल पुरताच सीमित राहील. देशातल्या अन्य राज्यात फारसा राहणार नाही. त्यामुळं भाजपेयींनी ममतादीदींना लक्ष्य बनवलं प्रधानमंत्रीपदाचा दावेदार बनावं यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या पुढील काळात भाजपेयींच्यावतीने ज्या राजकीय घडामोडी घडतील त्या ममतादीदींना राष्ट्रीय नेतृत्व देणाऱ्या असतील. त्यामुळं ममतादीदींचा स्वभाव पाहता त्या अधिक आक्रमक होतील. चर्चेत राहतील. भाजपेयींना जे अपेक्षित आहे ते साध्य होईल. भारतीय मतदारांपुढे काँग्रेस-राहुल-प्रियांका नव्हे तर महागठबंधन-ममतादीदी ह्याच मोदींना प्रबळ विरोधक ठरतील. त्याच आव्हान देणाऱ्या नेत्या ठरतील. असं वातावरण निर्माण करतील. असं घडलं तर भाजपेयीं-मोदी-शहा यांचं फावणार आहे. भाजपेयींची ही राजकीय खेळी लवकरच दिसून येईल! म्हणतात ना ‘ कहीपे निगाहे… कहीपे निशाणा! ममतादीदींवर निशाणा असला तरी निगाहे मात्र राहुल-प्रियंकावर असणार आहे !

– हरीश केंची
९४२२३१०६०९

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like