भाजपच्या ‘बंडखोर’ आमदाराची पक्षाला ‘सोडचिट्ठी’, पक्षाने अन्याय केला म्हणत Fb वरून केली पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेमुळे सगळीकडे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक ठिकाणी युतीतील उमेदवारांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंडाचे निशाण फडकवले होते. यामुळेच कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे आणि ‘शिट्टी’ या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

फेसबुकवरील एका पोस्टद्वारे पवार यांनी आपल्यामुळे पक्षाला त्रास होऊ नये यासाठी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदार संघातून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ निवडणूक लढवणार होते. मात्र ऐन वेळी शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना तिकीट दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत. पक्षाने पवार यांना डावलून मतदारसंघ सोडल्याने पवार यांनी आता अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे.

काय म्हणालेत नेमकं पवार आपल्या फेसबुकवरून
आज खूप जड अंतकरणाने एक कटू निर्णय मला घ्यावा लागतोय, कारण शिवसेनेने माझ्यावर अन्याय केला आहे.
पक्षाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून राजीनामा दिला.
२०१४ साली युती नसताना भाजपाच्या तिकीटावर मी जिंकून आलो. मी पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न देखील केले.
मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय करून मित्रपक्षाला ही जागा सोडली.
काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात.
आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे.
काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.

अशाप्रकारची भावनात्मक पोस्ट पवार यांनी आपल्या फेसबुकवरून केली आहे आणि शिट्टी या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगत निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आहेत.

Visit : Policenama.com