घर खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. गेल्या वर्षापासून अर्थव्यवस्थेत मरगळ आली आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. ही सवलत पुढील 2 वर्षांसाठी असेल. एमएमआरडीए, पुणे, नागपूर मध्ये महापालिका क्षेत्रात येणाऱ्या बांधकामांना ही सवलत लागू असेल. यामुळे राज्याला 25 हजार कोटींचे नुकसान होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती आहे. बांधकाम क्षेत्र देखील याला अपवाद नाही. जीएसटी, नोटाबंदी याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला. मागणीच नसल्याने मुंबईतील हजारो घरे विकली न गेल्याने पडून आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांचे पैसे अडकून बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी –
अर्थसंकल्पात सरकारकडून शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवण्यात आला असल्याचे दिसले. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांची 2015 ते 2019 या कालावधीत 2 लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देणार असल्याचा निर्णय घेतला आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.