‘कोविड’ लढ्यात महाराष्ट्र देशासाठी ठरेल उदाहरण, केंद्रानं केलं ‘कौतुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोना अद्याप नियंत्रणात नसला तरी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असल्याने चांगले परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये थेट केंद्र सरकारनेच राज्याच्या प्रयत्नांवर समाधान व्यक्त केलं आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा झोकून काम करत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या चाचण्या कमी, मृत्यू, कोरोना रुग्ण संख्या यासारख्या मुद्यावरून विरोधी पक्ष राज्य सरकारला सतत लक्ष्य करत आहे. त्याच वेळी आज केंद्रीय आरोग्य सह सचिव लव अग्रवाल यांच्या उपस्तितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या उपाय योजनांची प्रशंसा करण्यात आली. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळालेली ही समाधानाची पावतीच ठरली आहे.

आज झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लव अग्रवाल यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, उपस्थित होते. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. यावेळी लव अग्रवाल म्हणाले, मुंबई तसेच महाराष्ट्राने आणखी काही उपाय योजनांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले तर कोविड लढ्यात संपूर्ण देशासाठी महाराष्ट्र उदाहरण निर्माण करू शकतो. अग्रवाल यांनी विशेषत:मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कोविडचा मुकाबला करण्यात येत आहे, त्याविषयी समाधान व्यक्त केले.