भाजपासोबतची 25 वर्षाची ‘मैत्री’ का तुटली ? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘मी तर त्यांच्याकडे चंद्र-तारे नव्हते मागितले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपासमवेत मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादाबाबत ठाकरे यांनी सांगितले की मी त्यांच्याकडे चंद्र तारे नव्हते मागितले. असे मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये छापण्यात आली आहे.

का सोडली भाजपची सोबत?
उद्धव ठाकरेंना या मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आले की अखेर त्यांनी भाजपासोबतची २५ वर्ष जुनी मैत्री का तोडली. त्यावर ते म्हणाले की, ‘मला माहित नाही, पण मला केवळ इतकेच सांगायचे आहे की त्यांनी दिलेले वचन पाळले असते तर काय झाले असते. असे मी काय मोठे मागितले होते? आकाशातील चंद्र तारे मागितले होते काय? जे लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्यात ठरले होते तेवढेच मागितले होते.’

‘आम्ही हिंदुत्वावर उभे आहोत’
या खास मुलाखतीत ठाकरे यांना हिंदुत्वावरही प्रश्न विचारण्यात आले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा पक्षाने बाजूला सारला आहे का असे देखील विचारले गेले. यावर ते म्हणाले, ‘आम्ही हिंदुत्वावर उभे आहोत आणि राहू.

मुख्यमंत्रीपदी विराजमान होणे धक्कादायक की स्वप्न?
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या बाबतीत ठाकरे म्हणाले की त्यांनी वडिलांना दिलेले आश्वासन पाळले आहे. तसेच ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार करणे मला ना धक्कादायक वाटले आणि ना ते माझे स्वप्न होते. वडिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे हे महत्वाचे होते आणि मी ते पूर्ण करीन.