खुशखबर ! कर्जमाफीच्या दुसर्‍या टप्प्याबाबत मंत्री बच्चू कडूंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारं असल्याचं सांगत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज (सोमवार) जाहीर करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. 20 ते 25 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

तसेच यापूर्वी तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. तब्बल 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित होते. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.