सावधान ! महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांची संख्या 6 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील नागरिकांना सावध करणारी ही बातमी आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या चीनी कोरोनाव्हायरसच्या संशयीतांची महाराष्ट्रात संख्या वाढली आहे. नुकतेच चीनहून भारतात परणाऱ्या एका व्यक्तीला या व्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे आतापर्य़ंत महाराष्ट्रात या व्हायरची लागण झाल्याच्या संशयीत रुग्णांची संख्या 6 वर पोहचली आहे. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.27) रात्री आलेल्या या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षण आढळून आली. त्याला पुण्यातील नायडू रुग्णालयात एका विशेष विभागात दाखल करण्यात आले आहे. मुंबई, पुण्यात एकूण सहा जणांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले असून 6 पैकी 4 जण मुंबई आणि 2 जण पुण्यातील रुग्णालयात आहे. त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यामध्ये व्हायरस सापडला नाही.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान चीनहून भारतात आलेल्या 3 हजार 756 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आरोग्या विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार अशा प्रवाशांची यादी तयार करणार आहे जे चीनहून विशेषत: वुहान परिसरातून 1 जानेवारीला मुंबईत आले आहेत. त्यानंतर त्यांच्या आरोग्य विषयक माहिती घेतली जाणार आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 X 7 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोरोनाव्हयरसबाबत काहीही माहिती हवी असल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान केंद्र सरकारने केले आहे. संपर्क साधण्यासाठी +91-11-23978046 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा