Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 17433 नवे पॉझिटिव्ह तर 292 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम आहे. आज राज्यात तब्बल 17 हजार 433 नवीन रुग्णांचं निदान झाले आहे. तर गेल्या 24 तासात 292 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात उच्चांकी 17 हजार 433 नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्यानं रुग्णसंख्या 8 लाख 25 हजार 739 इतकी झाली आहे. तर सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 2 लाख 1 हजार 703 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दिवसभरात 13 हजार 959 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजवर 5 लाख 98 हजार 496 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 42 लाख 84 हजार चाचण्यांपैकी 8 लाख 25 हजार 739 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात कोरोनामृतांचे प्रमाणही वाढतच आहे. आज राज्यात तब्बल 292 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामृतांचा आकडा 25 हजार 195 इतका झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर 3.05 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 14 लाख 4 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 36 हजार 785 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.