भाजपकडून ‘या’ 4 बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून इच्छूक असलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या चार उमेदवारांची भाजपने हकालपट्टी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपने आज हकालपट्टी केलेल्यांमध्ये तुमसरमधील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, चिंचवडमधून बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर लातूर येथून दिलीप देशमुख यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बंडखोर उमेदवारांना भाजपाने घरचा रस्ता दाखविला असला तरी अद्याप शिवसेना उमेदवाराविरोधात निवडणूक लढणाऱ्यांबाबत भाजपने सोयीस्कर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहिलेले नरेंद्र पवार, सावंतवाडी येथील दीपक केसरकर यांच्याविरोधात उभे राहिलेले राजन तेली अशा नेत्यांची हकालपट्टी करण्याबाबत भाजपने सध्या सावध भूमिका घेतली आहे.

visit : policenama.com