HM अमित शहांची पहिली सभा सर्वाधिक बंडखोरी झालेल्या ‘या’ मतदारसंघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका पंधरा दिवसापूर्वी येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा लातूरमधील औसा मतदारसंघात घेणार आहेत.उद्या बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याला अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्र्याचे माजी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघात भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याच्या प्रचारासाठी अमित शहा पहिली प्रचारसभा घेणार आहेत. औसात अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे पीए नको, तर भूमिपुत्राला उमेदवारी द्या, अशी मागणी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या औसा मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण उटगे, बजरंग जाधव, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी अर्ज दाखल केला आहे.

अभिमन्यू पवार यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील उंबडग्यात (ता.औसा) झाला. अभिमन्यू पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून औसा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला होता. मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणून तेथे कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. परिणामी, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकरआणि पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. अरविंद निलंगेकर यांच्यासाठी संभाजी पाटील-निलंगेकर यांनी औसा येथून उमेदवारी मागितली होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी शिवसेनेच्या दिनकर मानेंवर जवळपास नऊ हजार मतांनी विजय मिळविला होता. भाजपचे उमेदवार पाशा पटेल यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

 

Visit : Policenama.com