नियमानुसार बाळासाहेब थोरात हेच विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत उद्या विशेष अधिवेशन होणार आहे. यात हंगामी अध्यक्षांची निवड होणार आहे. परंतु हंगामी अध्यक्ष कोण यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू आहे. राज्यपाल आता कोणाला हंगामी अध्यक्ष करतात हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनाच हंगामी अध्यक्ष केले पाहिजे असा आग्रह होताना दिसत आहे. परंतु आता राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

2014 साली हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य जीवा पांडू गावित यांची निवड करण्यात आली होती. त्यांनीच 2014 साली निवडून आलेल्या आमदारांना आमदारकीची शपथ दिली होती. त्यापूर्वी म्हणजेच 2009 साली हंगामी अध्यक्ष म्हणून गणपतराव देशमुख यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी विधानसभेत ते सर्वात ज्येष्ठ नेते होते. 2014 सालीही गणपतराव देशमुख सर्वात जास्त वेळा निवडून आलेले सदस्य होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी हंगामी अध्यक्षपदासाठी नकार दिला. त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांना विचारण्यात आलं होतं. त्यांनीही प्रकृतीच्या कारणानं हंगामी अध्यक्ष होण्यास नकार दिला होता. त्यानंतर ज्येष्ठ सदस्य म्हणून जीवा पांडू गावित यांनी हंगामी अध्यक्ष पद स्विकारले होते.

ज्येष्ठ सदस्याच्या अंगानं विचार केला तर 2019च्या निवडणूकीनंतर बाळासाहेब थोरात हे 8 वेळा निवडून आलेले एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे ते सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या व्यतिरीक्त 7 वेळा निवडून आलेले 6 सदस्य आहेत. यात दिलीप वळसे पाटील, अजित पवार, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, कालिदास कोळंबकर आणि के सी पाडवी यांचा समावेश आहे. याच क्रमानं त्यांची नावे विधानभवनाच्या रेकॉर्डवर आहेत. याशिवाय 11 सदस्य असे आहेत जे 6 वेळा निवडून आले आहेत. विधीमंडळ सचिवालयानं राज्यपालांकडे एकूण 18 नावे पाठवली आहेत. त्यात या सगळ्या नावांचा समावेश आहे.

राज्यपाल ज्येष्ठ सदस्य म्हणून बाळासाहेब थोरातांची निवड करत असतील तर ते संकेतांना धरून आहे. परंतु राज्यपाल राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले आणि भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले बबनराव पाचपुते किंवा कालिदास कोळंबकर या दोघांपैकी एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्याचीही शक्यता आहे.

Visit : Policenama.com