Coronavirus : मुंबईतील खासगी रूग्णालयांवर ‘या’ 5 IAS अधिकार्‍यांचा राहणार ‘वॉच’

मुंबई : वृत्तसंस्था –  मुंबईतील खासगी रुग्णालयांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांकडून येणाऱ्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक खासगी रुग्णालयांवर गेल्या काही दिवसांत मनमानी केल्याचा आरोप आहे. त्याच तक्रारी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके (बीएमसी) ने खासगी रुग्णालयांत रूग्णांना भरती न केल्याची किंवा अधिक फी आकारल्याची तक्रार अलीकडील दिवसांत ऐकली होती आणि याबाबत राज्य सरकारसमोर आपला मुद्दा मांडला होता.

काही खासगी रुग्णालयांवर असे आरोप देखील आहेत की, ते कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हवे तेवढे पैसे आकारत आहेत. राज्य सरकारने कोविड-१९ ट्रीटमेंटवर कॅप लावला आहे. म्हणजेच कोरोनाच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेले फिक्स चार्जेस रुग्णालये स्वीकारत नाहीत. तसेच त्यांच्यावर कोरोना बेडची माहिती लपवल्याचा देखील आरोप आहे.

महाराष्ट्र सरकारला आशा आहे की, आता खासगी रुग्णालयांच्या या तक्रारी बंद होतील. खासगी रुग्णालयांच्या देखरेखीच्या जबाबदारीसाठी महाराष्ट्र सरकारने पाच अधिकारी निश्चित केले आहेत, त्यांना ईमेलवरून आपली तक्रार सांगता येईल. म्हणजेच आता मुंबईतील ३५ रुग्णालये या पाच अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असतील.

१.  मदन नागरगोजे (२००७ बॅचचे आयएएस अधिकारी)- त्यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी, जसलोक, ब्रीच कँडी, एचएन रिलायन्स, भाटिया, कॉन्व्हेस्ट आणि मंजुळा एस बदानी जैन हॉस्पिटल आणि एसआरसीसी हॉस्पिटलची जबाबदारी आहे. या रुग्णालयांशी संबंधित तक्रारींसाठी मदन नागरगोजे यांच्या ईमेल आयडी- [email protected] या वर संपर्क साधता येईल.

२.  अजित पाटील (२००७ बॅचचे आयएएस अधिकारी)- त्यांना मसिना हॉस्पिटल, वोकहार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान, ग्लोबल, के जे सौम्या, गुरु नानक आणि पीडी हिंदुजा हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात आली आहे. या रुग्णालयांशी संबंधित तक्रारींसाठी अजित पाटील यांच्या ईमेल आयडी- [email protected] या वर संपर्क साधता येईल.

३.  राधाकृष्णन (२००८ बॅचचे आयएएस अधिकारी)- त्यांना रहेजा, लीलावती, होली फॅमिली, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बीएसईएस, सुश्रुषा हॉस्पिटल आणि होली स्पिरीट हॉस्पिटल सोपवले आहे. या रुग्णालयांशी संबंधित तक्रारींसाठी राधाकृष्णन यांच्या ईमेल आयडी- [email protected] या वर संपर्क साधता येईल.

४.  सुशील खोडवेकर (२००९ बॅचचे आयएएस अधिकारी)- कोहिनूर हॉस्पिटल, हिंदू सभा, एसआरव्ही चेंबूर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एलएचएच हिरानंदानी, सुराणा सेठिया आणि फोर्टिस हॉस्पिटलची जबाबदारी दिली आहे. या रुग्णालयांशी संबंधित तक्रारींसाठी सुशील खोडवेकर यांच्याशी ईमेल आयडी- [email protected] या वर संपर्क साधता येईल.

५.  प्रशांत नारनवरे (२०११ बॅचचे आयएएस अधिकारी)- करुणा हॉस्पिटल, कोकिलाबेन, संजीवनी, नानावटी, अ‍ॅपेक्स आणि अ‍ॅपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलची जबाबदारी यांच्याकडे आहे. त्यांना तक्रार पाठवण्यासाठी आपण [email protected] वर ईमेल करू शकता.

बीएमसीने आपल्या ऑडिट डिपार्टमेंटमधून दोन अधिकाऱ्यांना देखील या सर्व रुग्णालयांच्या बिलिंगवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवले आहे.