‘आयुष’च्या उपचारांबाबत सल्ल्यासाठी ठाकरे सरकारनं नेमली कृती समिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभर कोरोना विषाणूविरुद्ध लढा सुरू आहे. सर्वच देशांत विविध प्रयोग करून कोरोनावर लस शोधली जात आहे. काही लसींचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. भारतातील अनेक कंपन्यांमध्येही असे संशोधन सुरू आहे. कोरोना आपल्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करत असल्यामुळे ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी प्रतिकारशक्ती वाढवल्यास हितकर ठरेल. त्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्राबरोबर भारतातील पारंपरिक औषध उपचार पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिला आहे.

आयुर्वेदातील काही काढे प्रतिकारशक्ती वाढवतात तसेच होमिओपॅथीतील काही औषधं प्रतिकासशक्ती वाढवतात त्यामुळे त्यांचे सेवन नागरिकांना करावे असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. हा सल्ला देताना कोणत्या औषधांचा वापर करावा हेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सर्वाधिक आहे त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या उपचार पद्धतींचा वापर करायला हवा.

आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या उपचारांपैकी कोणते उपचार विशेषकरून कोविडविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवतात याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने एक कृती समिती स्थापन केली आहे. ही माहिती राज्य सरकारला या उपाययोजनांबद्दल सल्ला देणार आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने दिली आहे.