केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे देशाची मान खाली गेली’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात ठाकरे सरकार पूर्ण अपयशी ठरले असून त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची टीका हर्षवर्धन यांनी केली आहे. कोरोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप निव्वळ खोटे आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. ठाकरे सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे कोरोना विरोधातील लढाईत सुरु असलेल्या प्रयत्नांना धक्का बसत असून देशाची मान खाली गेल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.

आरोग्य कर्मचारी असो की फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण महाराष्ट्र सरकारची कामगिरी फार काही कौतुकास्पद राहिली नाही. महाराष्ट्र सरकार नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे सोडून खंडणीच्या वसुलीत गुंतले आहे, हे अतिशय धक्कादायक आहे, अशी बोचरी टीका हर्षवर्धन यांनी केली आहे.

हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड सरकारच्या आरोपांचा समाचार घेतला. छत्तीसगडमधील नेते चुकीची माहिती पसरवत असून लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. छत्तीसगड सरकारने अशा परिस्थितीत गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.