फडणवीस सरकारचा आणखी एक ‘निर्णय’ ठाकरे सरकारने ‘गुंडाळला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय गुंडाळण्यास सुरुवात केली. ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय बासनात गुंडाळला आहे. फडणवीस सरकारने सुरु केलेले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद केल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली.
शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतणीस यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडला होता.

या डळाचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे, त्याचे तज्ज्ञ कोण आहेत याबाबत कोणताही पारदर्शकता पाळली गेली नाही, असा आक्षेप आमदार विलास पोतणीस यांनी घेतला होता. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. राज्यातील 83 शाळांनी या शिक्षण मंडळाची मान्यता मिळवून त्यांचे अभ्यासक्रम सुरु केले होते. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये राज्यातील तेरा जिल्हा परिषद शांळांना या मंडळाची अस्थायी मान्यता देण्यात आली होती.

तसेच चालू वर्षामध्ये या मंडळाशी संलग्न होऊ पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित अशा 70 शाळांची निवड करण्यात आली होती. मात्र, मंडळाचे कोणतेही नियोजन आणि अभ्यासक्रम निश्चित नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आला होता. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आधी आढावा घ्यावा आणि नंतर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. तर विशिष्ट विचारसरणीशी संबंधित या मंडळाचा अभ्यासक्रम असल्याने हे मंडळ बरखास्त करण्याची मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे मंडळ बरखास्त केले.