Shiv sena : ‘जनतेनं मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, आता विरोधी पक्षानं 1 मे पर्यंत घरीच बसावं’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी (दि. 14) रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला होता. लॉकडाउनला लोकांचा तीव्र विरोध होईल, असा इशारा भाजपने दिला होता. मात्र तसे काहीच झाले नाही, असे म्हणत विरोधकांच्या या भूमिकेचा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाउन केल्याने लोकांनी त्यांचे ऐकले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने आता 1 मेपर्यंत घरीच बसावे असा सणसणीत टोला शिवसेनेने भाजपला हाणला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे सात-आठ दिवस लॉक डाऊनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी बंदची आखणी केली आहे. मनात आलं म्हणून लॉकडाऊन केले नाही. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना माणुसकीला प्राधान्य दिले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे लॉकडाऊनची घोषणा होताच जो जेथे आहे तेथेच अडकून पडल्याची आठवणही शिवसेनेने करून दिली आहे. संपूर्ण देशातच कोरोनाचा कहर सुरु आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत नाही. उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात आदी राज्यात उच्च न्यायालयास हस्तक्षेप करून लॉकडाऊन करा असे सांगावे लागत आहे. याचा अर्थ महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनी कोरोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. कोरोना विषाणू कुणालाच सोडत नाही. सध्याच्या संकटाच्या स्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बंद पुकारला पण त्यांनी लोकांसाठी ज्या घोषणा केल्या त्या योग्य आहेत. 7 कोटी जनतेला सरकार एक महिनाभर मोफत गहू-तांदूळ देणार आहे. शिवभोजन थाळी मोफत देणार आहे. शेवटी लॉकडाऊन काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही. भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील असे शिवसेनेने म्हटले आहे.