महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला ! चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

जळगाव : मागील काही दिवसांपासून सीमेवर दहशवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राने तीन वीर सुपुत्र गमावले आहेत. काल पुन्हा एकदा काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले. ते अवघ्या 21 वर्षांचे होते. यश यांच्या मागे त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असे कुटुंब आहे.

काल दुपारी शत्रूविरोधात लढा देत असताना यश देशमुख या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आहे. दुपारी दोन वाजाताच्या सुमारास हे वृत्त समल्यानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. यश हे वर्षभरापूर्वीच सैन्यदलात भरती झाले आणि ट्रेनिंगनंतर जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते.

काश्मीरचे आयजी म्हणाले की, तीन दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन सैनिक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत ते शहीद झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैश या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

यश देशमुख शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली होती. यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे. यश यांच्या आई-वडिलांना मुलगा शहीद झाल्याचे उशीरापर्यंत सांगण्यात आलेले नव्हते.

काल मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभरात वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येत असताना श्रीनगरमधून हे दु:खद वृत्त येऊन धडकले. या हल्ल्यात यश यांच्यासह सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांनी परिमपुरा परिसरातील खुशीपुरा येथे सुरक्षा दलावर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली होती.